छत्रपती संभाजीनगर : पहाडसिंगपुरा भागात शुक्रवारी (ता. २७) एका डेंग्यू संशयित महिलेचा मृत्यू झाला. हा गेल्या काही महिन्यांतील तिसरा बळी असल्याने शहराचे टेन्शन वाढले आहे. सध्या ३८ रुग्ण पॉझिटिव्ह असून, या प्रकारानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग ॲक्टिव्ह मोडवर आला आहे. रेड झोनमध्ये असलेल्या ११ वसाहतीत अबेटिंग आणि धूर फवारणी करण्याचे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले आहेत.
वातावरणातील बदलामुळे शहरात सध्या व्हायरलची साथ सुरू असून, घराघरांत सर्दी, खोकला, तापेचे रुग्ण आढळून येत आहे. दिवसभर उष्णता आणि रात्री थंडी जाणवत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यातच डेंगी पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या वाढत आहे. महापालिकेसह खासगी रुग्णालयात सर्दी, तापेच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.
अशा रुग्णांची महापालिकेच्या आरोग्य केंद्रात डेंग्यूची चाचणी मोफत केली जात आहे; तसेच आरटीपीसीआर चाचणीही करण्यात येत आहे. दरम्यान, दोन महिन्यांत डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला होता. त्यात शुक्रवारी एक संशयित महिलेचा मृत्यू झाला.
पहाडसिंगपुरा भागातील कोमल सदाशिव रायबोले (वय ३०) या चार दिवसांपासून सर्दी, खोकला, तापेने आजारी होत्या. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, त्या बेशुद्ध झाल्या व त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन लॅबमध्ये तपासले असता त्या डेंग्यू पॉझिटिव्ह निघाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे संबंधित रुग्णालयाने महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविले आहे. या प्रकारानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने नव्याने उपाय-योजना सुरू केल्या आहेत.
११ वसाहती रेड झोनमध्ये
शहरातील ११ वसाहती डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रेडझोनमध्ये आहेत. या भागाचा हाउस इंडेक्स दहा पेक्षा अधिक आहे. त्यात हमालवाडा, अयोध्यानगर एन-७, गरमपाणी, एन-१२ डी सेक्टर, समतानगर, कैलासनगर, मयूरनगर, क्रांतीनगर, हर्सूल सोनारगल्ली, कुंभारगल्ली, न्यू हनुमाननगर गल्लीनंबर ४ व ५ आणि न्यायनगर या वसाहतींचा समावेश आहे. या भागांचा इंडेक्स १२ ते २२ दरम्यान असून, तो दहाच्या खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.
डेंग्यूपासून संरक्षण कसे करावे?
▪️सतत पाच दिवस ताप येत असेल तर डॉक्टरांकडे जा.
▪️तुम्ही जिथे राहता त्या परिसराची स्वच्छता ठेवा.
▪️रोज पाण्याने भांडी आणि टाक्या स्वच्छ करत राहा.
▪️ऑक्टोबर हिट असल्याने कूलरमधील पाणी सतत बदलत राहा.
▪️मुलांना सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडू देऊ नका.
कोरोनाचा नवा व्हेरियंट तर नाही?
शहरात मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला, तापेच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. त्यातील अनेक डेंग्यू आणि न्यूमोनिया संशयित आहेत. खासगी रुग्णालयासह सरकारी रुग्णालयातही ओपीडीमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये अशा रुग्णांची संख्या अधिक आहे. अनेकांचा खोकला ८ ते १० दिवस थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा कोरोनाचा नवा व्हेरियंट तर नाही ना, या दिशेने आरोग्य विभागाने तपासणी करणे गरजेचे झाले.
पहाडसिंगपुरा भागातील महिलेचा मृत्यू झाला असून, त्या डेंग्यू संशयित आहेत. नागरिकांना ताप असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार घ्यावेत. डेंगीसंदर्भात चाचणी करून घ्यावी.
- डॉ. पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका.