
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित केलं. यावेळी त्यांनी दहशतवाद, लोकशाही, एआय, रशिया-युक्रेन युद्ध आणि भारत अमेरिका संबंध अशा विविध विषयांवर भाष्य केलं. त्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे जाणून घेऊयात..
अमेरिकेच्या काँग्रेसला संबोधित करणे ही खरंच सन्मानाची बाब आहे. ही गोष्ट दोन वेळा करायला मिळणे हे खरंच अपवादात्मक प्रिव्हिलेज आहे. या सन्मानासाठी मी १.४ अब्ज लोकांचे मनापासून आभार मानतो, असं मत पंतप्रधान मोदींनी या भाषणावेळी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले, की सात वर्षांपूर्वी २०१६ मध्ये जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा तुमच्यापैकी जवळपास निम्मे लोक इथे होते. मी या जुन्या मित्रांचा, आणि नवीन मित्रांचा उत्साह पाहू शकतो. गेल्या भेटीपासून आतापर्यंत बरंच काही बदललं आहे. मात्र, भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक दृढ करण्याची वचनबद्धता मात्र सारखीच आहे.
अमेरिका आणि भारताची विश्वासार्ह भागिदारी ही नवीन पहाटेच्या सूर्याप्रमाणे आहे, जी सगळीकडे प्रकाश पसरवेल. २०१६ मध्ये मी म्हटले होते, की आमचे नाते भविष्यासाठी महत्त्वाचे आहे, ते भविष्य आज आहे. असं मोदी म्हणाले. आज अमेरिका आणि भारत विविध क्षेत्रांमध्ये एकत्र काम करत आहे. समुद्रापासून अंतराळापर्यंत, सायन्स आणि सेमिकंडक्टर, स्टार्टअप आणि सस्टेनेब्लिटी, टेक आणि ट्रेड, फार्मिंग आणि फायनान्स, आर्ट आणि एआय अशा सर्व क्षेत्रांमध्ये भारत-अमेरिका सोबत आहे; असंही मोदींनी यावेळी म्हटलं.
लोकशाहीपंतप्रधान मोदी म्हणाले, की अमेरिका ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहे. तर, भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही. त्यामुळे या दोन देशांमधील भागिदारी ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्यूथर किंग हे दोन्ही देशांचे आदर्श आहेत. भारत आणि अमेरिकेवर या दोघांचा प्रभाव आहे. दोन्ही देशांमध्ये मैत्री आणि विश्वास वाढत आहे.दहशतवादपंतप्रधान मोदींनी यावेळी दहशतवादावर देखील भाष्य केले. २६/११ चा मुंबईवरील हल्ला आणि ९/११ चा अमेरिकेतील हल्ला या दोन्ही हल्ल्यांची त्यांनी आठवण काढली. कट्टरवाद आणि दहशतवाद हा संपूर्ण जगासाठी गंभीर धोका आहे. त्यामुळे दहशतवादाला सामोरं जाण्यासाठी कोणतीही शंका नसावी असं ते म्हणाले.या भाषणात त्यांनी चीन आणि पाकिस्तानलाही नाव न घेता टोले लगावले. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सध्या संघर्षाचे काळे ढग आहेत. या क्षेत्रात कोणीही आक्रमकपणा दाखवू नये, असं ते म्हणाले. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे, त्यामुळे त्याला समर्थन देणाऱ्यांविरोधात आणि दहशतवादाला चालना देणाऱ्यांविरुद्ध आपण एकत्र लढा दिला पाहिजे, असं ते म्हणाले.