सुतार समाजाला ब्राह्मणांमध्ये स्थान द्या. आरक्षण रद्द करून खुल्या प्रवर्गात घ्या. – विश्वकर्मा प्रतिष्ठान, पुणे.
जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | ऑक्टोबर ०४, २०२३.
“आज आरक्षण मिळवण्यासाठी सामाजिक आंदोलने आणि संघर्ष होत असताना पुण्यातील सुतार समाजाने विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेली मागणी आदर्श प्रस्थापित करणारी आहे. ‘आमचे विचार प्रगत असल्याने आता आम्हाला जातीय आरक्षणाची आवश्यकता नाही. सबब आमचे आरक्षण रद्द करून आम्हाला ब्राह्मण समाजात घ्या.’ अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. विष्णू गरूड व श्री. संजय भालेराव यांनी केली आहे. राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून या गोष्टीचे तटस्थपणे अवलोकन केल्यानंतर माझ्या लक्षात आले की लोकांनी स्वतःहून अशी मागणी करणे ही परिपक्वचे लक्षण आहे. त्यामुळे असे विचार जाहीरपणे मांडून सरकारकडे मागणी करणाऱ्या या संस्थेचे, पदाधिकारी तसेच सदस्यांचे व समाजबांधवांचे मी अभिनंदन करतो.” या शब्दांत भारतीय जनता पार्टी चिपळूण-संगमेश्वरचे विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव यांनी कौतुक केले.
ते पुढे म्हणाले, “सामाजिक आरक्षण आणि आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण ही गरज असणे यात काहीच गैर नाही. पण तो आपला अधिकार आहे असा समज समाजात दृढ होणे अत्यंत चुकीचे आहे. घटनाकर्त्यांनी ज्या उदात्त हेतूने आरक्षणाची देण दिली आहे त्याचा विशिष्ट वेळेनंतर लाभ घेणे योग्य नाही. राज्य व केंद्र सरकारे लोकांच्या कल्याणासाठी आहेत, लांगूलचालन करणे टाळून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आणि दायित्व त्यांच्या शिरावर स्वतः जनतेने टाकले असताना आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणेला धारेवर धरणे कधीही अयोग्यच.”
याव्यतिरिक्त त्यांनी अन्य मागण्याही केल्या. यामध्ये सुतार विश्वकर्मीय समाजाला विश्वब्राह्मण दर्जा प्रदान करावा. दोन लाखांपर्यंत व्यवसाय कर्ज विनातारण उपलब्ध करून द्यावे. तालुका पातळीवर विश्वकर्मा औद्योगिक भवन उभारणे, ग्रामीण भागातील गरीब परिवारांतील सुतार बांधवांना घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांचे अनुदान सामुहिक विवाह सोहळ्याला अनुदान आदी मागण्या अंतर्भूत होत्या.