
दिल्ली कॅपिटल्सनं घरच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करुन हंगामातील त्यांचा पाचवा विजय नोंदवला.
दिल्ली : दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्सविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये घरच्या मैदानावर रोमांचक विजय मिळवत हंगामातील आपला पाचवा विजय नोंदवला. राजस्थाननं सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला 12 धावांचं लक्ष्य दिलं होतं, जे त्यांनी 4 चेंडूत पूर्ण केलं. या विजयासह दिल्ली संघ आता 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झाला असून गुजरातची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.
*चार चेंडूत जिंकला सामना :*
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सनं 20 षटकांत 188 धावा केल्या, ज्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सही 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावाच करु शकला. परिणामी सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यानंतर, राजस्थाननं फक्त 5 चेंडू खेळले ज्यात त्यांनी 11 धावा करुन रियान पराग आणि यशस्वी जयस्वालच्या रुपात त्यांच्या दोन्ही विकेट गमावल्या, त्यानंतर दिल्लीनं केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्सची जोडी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पाठवली ज्या दोघांनी फक्त 4 चेंडूत संघाला विजय मिळवून दिला.
*जैस्वाल आणि नितीश राणाची खेळी व्यर्थ :*
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान रॉयल्सला त्यांचा कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांच्या सलामी जोडीनं चांगली सुरुवात करुन दिली, ज्यात पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 61 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान संजू सॅमसन फलंदाजी करताना थोडा वेदनेनं ग्रस्त दिसत होता आणि त्यामुळं तो रिटायर्ड हर्ट झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. यशस्वी जैस्वालनं इथून धावा काढण्याची जबाबदारी घेतली. पण राजस्थानला पहिला धक्का रियान परागच्या रुपात बसला जो 8 धावा करुन बाद झाला. दरम्यान, यशस्वी जैस्वालनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं खर पण 51 धावा करुन तोही बाद झाला. जैस्वाल पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, नितीश राणानं राजस्थानच्या डावाची जबाबदारी घेतली.
*स्टार्कची घातक गोलंदाजी :*
या सामन्यात नितीश राणानं 51 धावांची शानदार खेळी केली, तर ध्रुव जुरेल 26 धावा काढून धावबाद झाला. राजस्थान रॉयल्सना त्यांच्या डावाच्या शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता होती. पण मिशेल स्टार्कच्या शानदार गोलंदाजीमुळं त्यांना फक्त 8 धावा करता आल्या ज्यामुळं सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सनं सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कनं 4 षटकांत 36 धावा देत 1 बळी घेतला आणि सुपर ओव्हरमध्ये फक्त 11 धावा दिल्या. याशिवाय दिल्लीकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
*दिल्लीकडून अभिषेक पोरेलची 49 धावांची खेळी :*
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाच्या डावाबद्दल बोलायचं झालं तर अभिषेक पोरेलनं 49 धावा केल्या, त्याशिवाय अक्षर पटेलनं 14 चेंडूत 34 धावा केल्या तर केएल राहुलनं 38 आणि स्टब्सनंही 34 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरनं 2 तर महेश थिकष्णा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.