दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडी कोठडीत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा संदेश माध्यमांसमोर वाचून दाखवलाय.
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणी राऊस एव्हेन्यू कोर्टानं ईडीच्या कोठडीत पाठवलं. आम आदमी पार्टी या कारवाईला सतत चुकीचं म्हणत आहे. आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी माध्यमांसमोर आपलं मत मांडलय. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. ज्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटलंय की,
‘जिंदगी के हर पल देश को समर्पित
मैं जल्द ही बाहर आऊंगा
जल्द ही सारे किये वादे पूरे करूंगा
समाजसेवा का काम नहीं रुकना चाहिए’..
सुनीता केजरीवाल यांनी पती अरविंद केजरीवाल यांचा संदेश एकूण 3 मिनिटे 13 सेकंदात वाचून दाखवला. सुनीता केजरीवाल यांनी सांगितलं की, मी अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी असून आज तुरुंगातून तुमचा मुलगा, तुमचा भाऊ अरविंद केजरीवाल यांनी तुम्हाला दिलेला संदेश वाचण्यासाठी पुढं आली आहे.
काय आहे संदेश :..
“माझ्या प्रिय देशबांधवांनो, मला काल अटक करण्यात आली. मी आत असो किंवा बाहेर, मी प्रत्येक क्षणी देशाची सेवा करेन. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव देशासाठी आहे. माझा जन्म संघर्षासाठी झाला. मी आजपर्यंत खूप संघर्ष केलाय आणि भविष्यातही माझ्या आयुष्यात मोठे संघर्ष लिहिलेले आहेत. म्हणूनच या अटकेमुळं मला आश्चर्य वाटत नाही. मला तुमच्याकडून खूप प्रेम मिळालय. भारतासारख्या महान देशात माझा जन्म झाल्यामुळं मी माझ्या मागील जन्मात खूप चांगली कामं केली असतील. आपल्याला एकत्र भारताला पुन्हा एकदा महान बनवायचं आहे. भारताच्या आत आणि बाहेर अशा शक्ती आहेत ज्या भारताला कमकुवत करत आहेत. सतर्क राहून या शक्ती ओळखल्या पाहिजेत. या शक्तींचा पराभव करायचा आहे. भारतात असे अनेक लोक आहेत, ज्यांना भारताला पुढं न्यायचं आहे. आपल्याला या शक्तींशी जोडलं पाहिजे आणि त्यांना आणखी मजबूत करावं लागेल.”
यानंतर सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल हे लोहासारखे मजबूत आहेत. केजरीवाल लवकरच देशाला दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करतील. लोकांच्या प्रार्थना अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहेत.
“माझ्या दिल्लीतील आई आणि बहिणी विचार करत असतील की केजरीवाल आत गेले आहेत, मला माहीत नाही त्यांना हजार रुपये मिळतील की नाही? मी सर्व माता भगिनींना आवाहन करतो की त्यांनी आपल्या भावावर आणि मुलावर विश्वास ठेवावा. तुमच्या भावाला आणि तुमच्या मुलाला जास्त काळ आत ठेवू शकतील अशा कोणत्याही भिंती नाहीत. मी लवकरच बाहेर येईल आणि मी माझे वचन पूर्ण करेल. केजरीवाल यांनी आश्वासन दिले आणि ते पूर्ण केलं नाही असं आजपर्यंत कधी घडलं आहे का? तुमचा भाऊ, तुमचा मुलगा लोखंडाचा बनलेला आहे आणि खूप मजबूत आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, कृपया एकदा मंदिरात जा आणि माझ्यासाठी देवाचा आशीर्वाद घ्या. करोडो लोकांच्या प्रार्थना माझ्या पाठीशी आहेत. ही माझी ताकद आहे. आम आदमी पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे की माझ्या अटकेमुळं समाजसेवा आणि जनसेवेचे कार्य थांबू नये, आणि हो यामुळं भाजपवाल्यांचा द्वेष करु नये. ते सर्व आमचे भाऊ-बहिणी आहेत. मी लवकरच परत येईन, तुमचेच अरविंद केजरीवाल.”
यावेळी सुनीता केजरीवाल यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. तसंच या संदेशाद्वारे त्यांनी दिल्लीतील जनतेला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहनही केलंय.