
लांजा :- मुंबई गोवा महामार्गावरील लांजा बाजारपेठेतील संपादित केलेल्या जागेवरील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई महामार्ग प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात गुरुवारी सकाळी सुरू केली. त्यामुळे बांधकामे काढून घेण्यासाठी व्यावसायिकांची धावपळ उडाली .
मुंबई – गोवा महामार्गाचे लांजातील काम गेली अनेक वर्षे रखडले होते. आता या कामाला गती देण्यात आली आहे. शहराच्या मध्यभागातून हा महामार्ग जातो. त्याच्या दुतर्फा छोटे – मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकानांचे छप्पर पुढे आणले होते. महामार्गासाठी संपादित जागेवर छोट्या व्यावसायिकांनी रस्त्याच्या बाजूला व गटारावर खोके, टपऱ्या उभारल्याने महामार्गाच्या कामाला व वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.
लांजा शहरातील कोर्ले फाटा ते साटवली रोडपर्यंत उड्डाणपुलाचे कामही वेगाने सुरू आहे. उड्डाणपुलाचे पिलर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे.