लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमुळे महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होणार आहे, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. मात्र, 40 पेक्षा जास्त जागा आम्हालाच मिळणार असल्याचा दावा नेहमीच महायुतीचे नेते करत आहेत.
मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या 1 जून रोजी होणाऱ्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केलीय. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी 486 जागांवर सहा टप्प्यांत मतदान पूर्ण झालं आहे. आता शेवटच्या टप्प्यात केवळ 57 जागांवर निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीबाबत आतापर्यंत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. सुप्रसिद्ध गुंतवणूकदार तसंच लेखक रुचिर शर्मा यांनी महाराष्ट्रात अतितटीचा सामना होणार असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या दोन मित्रपक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धक्का बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आंध्र प्रदेश वगळता बिहार, कर्नाटक, महाराष्ट्रात भाजपाचे मित्रपक्ष लोकसभा निवडणुकीत अत्यंत खराब कामगिरी करत आहेत, असं त्यांचं मत आहे.
महाविकास आघाडीला राज्यात निम्म्या जागा…
रुचिर शर्मा गेल्या दोन दशकांपासून देशातील निवडणुकांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ओळखले जातात. निवडणुकांसंदर्भात रुचिर शर्मा यांचा दांडगा अभ्यास आहे. एका प्रसारमाध्यम कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, “कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानं महाराष्ट्रातील शेतकरी संतप्त आहेत. ही बंदी सुमारे 6 महिने होती. त्यामुळं राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला निम्म्या जागा मिळू शकतात. परंतु, खरं नुकसान भाजपाच्या मित्रपक्षांना अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेला होणार आहे.” छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर येथील पत्रकार, उद्योगपतींची भेट घेऊन हे मूल्यमापन केल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रादेशिक पक्षांमध्ये फूट
महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना या दोन प्रमुख प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानं राज्यातील लोकसभा निवडणुकीबाबत भाकीत करणं जाणकारांना कठीण झालं आहे, हे विशेष. राष्ट्रवादी, शिवसेनेच्या बंडखोर गटांविरोधात लोकांमध्ये असलेला रोष लक्षात घेता राज्यात ‘एनडीए’ला मोठा फटका बसू शकतो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला आंध्र प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळू शकतो, परंतु इतर राज्यांतील ‘एनडीए’चे मित्रपक्ष अडचणीत असल्याचं दिसत आहे.
भाजपाला काँग्रेसमुळं धक्का….
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयू, कर्नाटकमध्ये एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस, आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीसोबत युती केली आहे. आंध्र प्रदेशात भाजपानं 25 पैकी फक्त 6 जागा लढवल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकमध्ये भाजपाला काँग्रेसमुळं धक्का बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.