मुंबई- मी मराठी एकीकरण समिती (नोंदणीकृत) व महाराष्ट्र संरक्षण संघटना, महाराष्ट्र राज्य या राजकारण बाह्य सामाजिक संघटनांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल तसेच मराठी समाजातील मान्यवर साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी, साहित्यिक श्री. लक्ष्मीकांत देशमुख, सौ. रेखा नार्वेकर यांच्यासह मराठी भाषा समितीचे डॉ. प्रकाश परब, माजी भाषा संचालक श्री. परशुराम पाटील, डॉ. रमेश साळुंखे यासारख्या मान्यवरांच्या मराठी बाबतच्या विचारांचे लेख सोबत राज्यघटनेतील भाषा विषयक अनुच्छेद आणि शासन निर्णय मराठी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “प्रिय आमुचा एक- महाराष्ट्र देश” या स्मरणिकेच्या दुसऱ्या पर्वाचे उदघाटन छत्रपती पदक विजेते श्री. मनोहर साळवी, माजी भाषा संचालक श्री. परशुराम पाटील, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर रमेश साळुंखे, मराठा महासंघाचे श्री. प्रशांत सावंत व संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र घाग इत्यादींच्या उपस्थितीत झाले.
तसेच यावेळी महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून “समजा, मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी झाली तर, उर्वरित महाराष्ट्रावर काय परिणाम होईल” या विषया अंतर्गत राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेतली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांना आज संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र घाग यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रथम व द्वितीय विजेत्या बबीता चिलवार, जालना आणि वैभव नाचरे, मुंबई यांच्या निबंधाचे वाचनही करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट महाराष्ट्र गीताने झाला. यावेळी संघटनेचे प्रमोद मसुरकर, विजय तेलंगे, मंदार नार्वेकर, केतन वेदक, अमर कदम, ऋषिकेश तांडेल, दीप्ती वालावलकर, रवींद्र शिंदे, आनंद करगुटकर, महेश गोरुवले, अजय कदम, दिवाकर मठकर, प्रकाश नामे, रुद्रेश सातपुते, आशिष मोरे, संदेश जाधव, शुभम सावंत, अजय कोयंडे इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.