
दापोली (प्रतिनिधी) : दापोली अर्बन बँक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध होणार की नाही याबाबत उत्सुकता असतानाच अखेर ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील ९ जागांसाठी १० अर्ज दाखल होते. त्यापैकी १ अर्ज मागे घेतला गेल्याने संचालक मंडळ बिनविरोध होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनेक वर्षानंतर अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सहकार क्षेत्रात दापोली अर्बन बँक ही अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर एकूण १५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये ३ जागा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळीच बिनविरोध झाल्या होत्या, तर ३ जागा या छाननी प्रक्रियेदरम्यान बिनविरोध झाल्या होत्या. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९ जागा असताना १० अर्ज दाखल झाले होते. त्यातील एका अर्जावर आक्षेप घेतल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद केला होता.
मात्र सहकार आयुक्ताकडे झालेल्या सुनावणीत हा अर्ज वैध ठरला होता. त्यामुळे ९ जागा व १० उमेदवार अशी निवडणूक होण्याची शक्यता होती. दापोली अर्बनचे विद्यमान अध्यक्ष श्री. जयवंत जालगावकर यांनी बँकेला १० ते १५ लाखांचा भुर्दंड निवडणूक प्रक्रियेमुळे लागू शकतो, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण वेगवेगळे पर्याय वापरु, असे जाहीर केले होते. त्यानंतर दापोलीत हालचालींना वेग आला होता व अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुक श्री. चंद्रशेखर जोशी यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. विजयी सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.