लोकसभा निवडणुकीनंतर आणि मोदी ३.० सरकारच्या पहिल्या बजेटनंतर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. देशभरात ही वाढ आज पासून लागू करण्यात आली आहे.
ऑगस्टचा पहिला दिवस दरवाढीचा ठरला आहे. एनडीएसरकारने पहिल्या अर्थसंकल्पानंतर सर्वसामान्य नागरिकांना सिलेंडरच्या किमती वाढवून मोठा धक्का दिला आहे. आज १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल ८.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर मुंबईत ७ रुपयांनी दरवाढ झाली आहे. ही दर वाढ केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली
*देशाच्या आर्थिक राजधानीत किती रुपयांना मिळणार सिलेंडर ?*
मुंबईकरांना देखील व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसला आहे. आज १ ऑगस्टपासून मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडर ८०२.५० रुपयांना मिळणार आहे. तर १९ किलोच्या निळ्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १६०५ रुपये झाली आहे. त्यात ७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पूर्वी हे दर १५९८ रुपये होते. चेन्नईतही एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८१७ रुपयांना मिळणार आहे. पूर्वी हा दर १९०९.५० रुपये होता.
दिल्लीत १ ऑगस्टला म्हणजेच आजपासून व्यावसायिक सिलेंडर १६५२.५ रुपयांना मिळणार आहे. इंडेनचा हा सिलेंडर १ जुलै रोजी तो १६४६ रुपये होता. यामध्ये ६.५० रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली आहे. येथे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. घरगुती १४ किलोच्या सिलेंडरची किंमत ८०३ रुपये आहे. तर १० किलो कंपोझिट एलपीजी सिलेंडर ५७४.५ रुपयांना उपलब्ध आहे.
कोलकात्याबद्दल बोलायचे झाले तर, येथे घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या ८२९ रुपये दराने उपलब्ध आहे, परंतु व्यावसायिक सिलिंडर महाग झाला आहे. आजपासून व्यावसायिक सिलेंडर हा १७५६ रुपयांऐवजी १७६४.५ रुपयांना मिळेल. येथे या १९ किलोच्या सिलेंडरची किंमत ८.५० रुपयांनी वाढली आहे. येथे १० किलो कंपोझिट सिलेंडरची किंमत ५९३ रुपये आहे.
पाटण्यात आज १४.२ किलोचा इंडेन एलपीजी सिलिंडर ९०१ रुपयांना उपलब्ध आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत १९१५.५ रुपयांऐवजी १९२३.५ रुपये झाली आहे. अहमदाबाद, गुजरातमध्ये १९ किलोचा निळा सिलेंडर आता १६६५ रुपयांऐवजी १६७१.५० रुपयांना मिळणार आहे. तर, १४ किलोच्या घरगुती एलपीजी लाल सिलेंडरची किंमत फक्त ८१० रुपये आहे.