नवी दिल्ली – आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना गुरुवारी दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणी ईडीने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकल्यानंतर काल संध्याकाळी सिंह यांना अटक करण्यात आली होती.
ईडी आणि संजय सिंह यांच्या वकिलांमध्ये आज पार पडलेल्या सुनावणीत अडीच तास वादावादी झाली. यानंतर न्यायालयाने सिंह यांना पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली. संजय सिंह यांना 10 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडी 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सिंह यांना न्यायालयात हजर करणार आहे.
नरेंद्र मोदी हे अदानींचे नोकर आहेत
न्यायालयातून बाहेर पडताना संजय सिंह म्हणाले- नरेंद्र मोदी हे अदानीचे नोकर आहेत. अदानींच्या नोकरांना आम्ही घाबरत नाही. पाहिजे तेवढे अत्याचार करा, काही हरकत नाही. हा पूर्णपणे खोटा आरोप आहे. याआधी, न्यायालयात हजेरी लावताना संजय सिंह यांना मीडियाने घेरले होते. यावेळी ते म्हणाले- “मोदीजी हरतील, ते निवडणूक हरत आहेत, म्हणूनच हे केले जात आहे.”
दोन कोटींचा व्यवहार
संजय सिंह यांचे वकील मोहित माथूर यांनी न्यायालयात सांगितले की, ‘सिंह यांना कोणत्याही आधाराशिवाय अटक करण्यात आली आहे.’ माथूर यांनी ईडीकडे रिमांड कॉपीही मागितली आहे. विशेष सरकारी वकील नवीन कुमार मट्टा यांनी ईडीतर्फे न्यायालयात हजेरी लावली होती. ईडीच्या वकिलाने सांगितले की, दोन वेगवेगळे व्यवहार झाले आहेत. यामध्ये एकूण दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. संजय सिंह यांच्यासाठी काम करणाऱ्या दिनेश अरोरा यांच्या वक्तव्यानुसार, त्यांनी फोनवरुन व्यवहाराची पुष्टी केली आहे. ईडीच्या रिमांड पेपरमध्ये सिंह यांच्या घरातील पैशांच्या व्यवहाराचा उल्लेख करण्यात आला आहे.
ईडीने सांगितले की, पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. इंडो स्पिरिटकडून पैसे घेतल्याचे रिमांड पेपरमध्ये म्हटले आहे. ईडीने पुढे सांगितले की, सर्वेश हा संजय सिंह यांचा कर्मचारी आहे. ही रक्कम त्यांना सिंह यांच्या घरी देण्यात आली होती, अशी पुष्टी दिनेश अरोरा यांनी केली.
मनीष सिसोदिया यांच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली
दुसरीकडे, मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आजही अपूर्ण राहिली. पुढील सुनावणी गुरुवारी (12 ऑक्टोबर) होणार आहे.