
मुंबई :- सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर महाराष्ट्रातील बैलगाडा मालक व शर्यत प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवावी यासाठी गाडा मालक प्रयत्नशील होते.
घाटात, मैदानात सर्वात कमी सेकंदात अंतर पार करणारी खिलारीची बैलजोडी म्हणजे गाडा मालकांची शान असते. मुंबई उच्च न्यायालयाने २०११ साली बैलगाडा शर्यंतींवर बंदी आणली होती. राज्य सरकारने देखील त्यासंबंधी परिपत्रक काढत बंदी जाहीर केली होती. त्यानंतर सातत्याने बैलगाडा मालक, शर्यत प्रेमींकडून बैलगाडा शर्यत सुरु करण्यात यावी याविषयी मागणी होत होती.
सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सशर्त तात्पुरती बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली होती. या अटी शर्थींची पूर्तता करणे बैलगाडा मालक, शर्यत आयोजकांना शक्य होत नसल्याने देखील त्यांच्यात नाराजीचे वातावरण होते. त्यातही राज्यात मोठ्या प्रमाणात यावर्षी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालय अंतिम निकाल काय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.