येत्या दोन दिवसात राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. येत्या 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर निकाल देणार आहेत. दुपारी 4 वाजता हा निर्णय येणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निर्णयावरच शिंदे आणि ठाकरे गटाचं भवितव्य ठरणार आहे. या सर्व घडामोडींवर प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अकोला/8 जानेवारी 2024- शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. येत्या 10 जानेवारी रोजी आमदार अपात्रतेवर निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे. त्यामुळेच या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी मोठं विधान केलं आहे. दहाव्या परिशिष्टाचा संदर्भ देऊन त्यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत.
दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. दोन्ही गटाकडून परस्परांविरोधात एकमेकांच्या आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याची एकत्रित सुनावणी ही विधानसभा स्पीकर समोर करण्यात आली होती. साधारणता याचा निकाल दोन दिवसात अपेक्षित आहे, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
कोणता निकाल आधी?..
16 आमदारांपासून जी सुरुवात झाली होती आणि 16 आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती ती दहाव्या परिशिष्टानुसार वैध आहे की अवैध आहे या संदर्भात विधान परिषदेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात. माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो, असं उज्ज्वल निकम म्हणाले. याच संदर्भातला निर्णय आधी लागण्याची शक्यता आहे. परंतु विधान परिषदेच्या अध्यक्षांनी ही बाब प्रथम तपासून बघण्याची आवश्यकता आहे, असं निकम म्हणाले.
नोटीसचा मजकूर ग्राह्य…
16 आमदारांना अपात्रतेची बजावलेली नोटीस दिली होती. त्या नोटीशीतील मजकूर हा दहाव्या परिशिष्टानुसार ग्राह्य धरतो का होतो का नाही हे आधी तपासल्या जाईल. त्यानंतरच यावर निर्णय येणं अपेक्षित आहे, असंही त्यांनी सांगितलं.
तो पहिला भूकंप असणार…
दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमदार अपात्रतेबाबत केवळ पोरखेळ सुरू असून सर्वोच्च न्यायालयाला आमची हात जोडून विनंती असेल की, सरकारला निर्णय घ्यायला लावा. त्यामुळे 10 तारखेला पहिला भूकंप राहुल नार्वेकर काय निर्णय घेतात यावर ठरणार आहे. नार्वेकर या केसमधून अंग काढून घेतील किंवा निर्णय न देण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोही पहिला भूकंप ठरेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.