राजापूर : कोकणात रिफायनरी प्रकल्प उभारणाऱ्या सौदी अर्माको या कंपनीने चीनमध्ये मोठा रिफायनरी प्रकल्प उभा करण्यासाठी नुकताच करार केला असून, चीनमधीलच आणखी एका प्रकल्पाचा विस्तार करण्याचीही घोषणा केली आहे.त्यामुळे कोकणातील वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कोकणात रिफायनरी प्रकल्प उभा करण्याची घोषणा २०१६ साली झाली होती. आधी हा प्रकल्प नाणार इथे होणार होता. मात्र शिवसेनेसह स्थानिकांचा विरोध झाल्याने नंतर बारसू इथे हा प्रकल्प करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र बारसू इथेही विरोध होत आहे. त्यात अजून या प्रकल्पासाठी तीन हजार एकर जागा संपादित व्हायची आहे.
हा प्रकल्प उभा करणाऱ्या सौदी आर्माको या कंपनीने ईशान्य चीन प्रांतातील लिओनिंगमध्ये तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी दोन दिवसांपूर्वी चिनी भागीदारांसोबत करार केला. हा प्रकल्प २०२६ पर्यंत कार्यान्वित होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. तसेच चीनमधील एका प्रकल्पाचा विस्तार व अद्ययावतीकरण करण्याचेही जाहीर केले आहे.