अन्यथा १५ ऑगस्टपासून काम बंद आंदोलनाचा ठेकेदारांचा इशारा
चिपळूण ,02 ऑगस्ट – रस्ते, साकव, पूल यांसारखी कामे कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आली आहेत. मात्र, दोन वर्षांचा कालावधी लोटूनही ठेकेदारांना अजूनही बिले मिळालेली नाहीत. तसेच ठेकेदारांचे काही प्रश्न प्रलंबित आहेत. थकीत देयके व प्रलंबित प्रश्नांबाबत उत्तर रत्नागिरीतील ठेकेदारांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक देत कार्यकारी अभियंता अमरजीत रामसे यांना जाब विचारला. थकीत देयके मिळावीत तसेच प्रलंबित प्रश्न सुटावेत, अन्यथा १५ ऑगस्टपासून कामे बंद करण्याचा इशारा ठेकेदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर, सचिन पाकळे, गणेश कांबळे, केतन पवार, राजेश खेडकर, राहुल गोपाळ, शंकर पवार, दीपक नाचणकर, राम नार्वेकर, रणजीत डांगे, सुरेश पवार, श्रीधर खेतले, राहुल माने, सुधीर भोसले, सचिन रेडीज, सुनील जाधव मल्लू राठोड मारुती पवार, सदाशिव पवार, बी. एन. पवार, प्रथमेश राठोड, तातोबा चव्हाण, पंकज माटे, मंगेश माटे, दीपक जाधव, मंगेश खोत, सौरभ चव्हाण, श्रीधर बागकर, राहुल राठोड, विकास राठोड, डी. एम. पोटे, दीपक डोंगरे आदी उपस्थित होते.
या निवेदनानुसार गेल्या दोन वर्षातील अनेक बिले सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहेत. तरी आम्ही सर्व ठेकेदारांनी पुढील टेंडर व आदेश मिळाल्यानंतर तात्काळ कामे पूर्ण केलेली आहेत. ती पूर्ण करीत असताना आम्ही नागरिकांना त्रास होऊ नये, याची काळजी घेतलेली आहे. मागील थकीत बिले असल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत असतांना ही कामे पूर्ण केलेली आहेत. यासाठी बँकांकडे जामीन तारण कर्ज काढून ही कामे पूर्ण केलेली आहेत, असा मुद्दा या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. याविषयी कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. एकंदरीत आम्ही ठेकेदार आर्थिक अडचणीत आलो आहोत, असे यावेळी ठेकेदारांनी स्पष्टपणे कार्यकारी अभियंत्यांना सांगितले.
आम्ही दोन वर्षांपूर्वीची कामे करूनही आम्हाला बिले मिळाले नाहीत. पूर्वी जीएसटी १२% होता. तो १८% जीएसटी झालेला आहे. तरी तो मागील बिलांवर १८% जीएसटी मिळावा ते आपण मान्य केले होते. परंतु, याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निविदेतील जाचक अटी कमी करण्यात याव्यात, असाही मुद्दा यावेळी मांडण्यात आला. एकंदरीत ठेकेदार आर्थिक दृष्ट्या अडचणीत आले असून आमच्या प्रलंबित प्रश्नांसह थकीत देयके लवकरात लवकर मिळावी, अन्यथा १५ ऑगस्ट पासून आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत, असा इशारा यावेळी ठेकेदारांनी दिला. आता शासन-प्रशासनाच्या भूमिकेकडे ठेकेदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठेकेदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया – सुरेश चिपळूणकर
पावसाळ्यापूर्वी ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना काही कामे तात्काळ करण्यास सांगितले. या कामांची बिले लवकरच देऊ, असा शब्द देखील दिला होता. यानुसार अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ठेकेदारांनी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण केली. मात्र, ठेकेदारांना अजून एक बिले मिळाले नाहीत यामुळे ठेकेदारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत, अशी प्रतिक्रिया ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश चिपळूणकर यांनी दिली.