नवी दिल्ली : लोकसभेत दहा वर्षांनंतर विरोधी पक्षनेत्याची निवड केली जाणार असून हे पद राहुल गांधींनी स्वीकारावे अशी जोरदार मागणी शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. या प्रस्तावाचा विचार करून निर्णय घेऊ, असे राहुल गांधींनी नेत्यांना सांगितल्याचे समजते.
२०१४ व २०१९ मध्ये काँग्रेस हा विरोधी पक्षांतील मोठा पक्ष असला तरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी किमान दहा टक्के जागा म्हणजे ५५ जागा पक्षाने जिंकल्या नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद दिले गेले नव्हते. आता मात्र, सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळू शकेल.
बैठकीमध्ये राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी असा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांनी राहुल गांधींसंदर्भातील प्रस्ताव मांडला व शशी थरूर यांनी अनुमोदन दिले. प्रामुख्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी व प्रियंका गांधी-वाड्रा यांनी प्रचार केला होता. यावेळी काँग्रेसच्या यश मिळाले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीच विरोधी पक्षनेते झाले पाहिजे, असे मत शिवकुमार व थरूर यांनी व्यक्त केले.
रायबरेली की, वायनाड?
राहुल गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेली व केरळमधील वायनाड या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. मात्र, या दोनपैकी एक जागा त्यांना सोडावी लागेल. त्याबाबत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवसांमध्ये निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे १७ जूनपर्यंत राहुल गांधी रायबरेली की वायनाडचे खासदार राहतील हे स्पष्ट होईल. पुढील दोन वर्षांनी केरळमध्ये विधानसभा निवडूक होणार असल्याने राहुल गांधींनी वायनाडच्या खासदारकीचा राजीनामा देऊ नये, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे तर, रायबरेली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असून तिथून राजीनामा दिल्यास चुकीचे संदेश दिला जाईल असेही मानले जात आहे.