अमेरिकेतील ‘न्यू यॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्रातील एका लेखाचा संदर्भ देऊन ठाकूर यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
नवी दिल्ली : चीन, ‘न्यूजक्लिक’ हे वृत्तविषयक संकेतस्थळ आणि काँग्रेस पक्ष भारतविरोधी नाळेशी जोडलेले आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केला. अमेरिकेतील ‘न्यू यॉर्क टाईम्स’ या वृत्तपत्रातील एका लेखाचा संदर्भ देऊन ठाकूर यांनी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला
‘न्यूजक्लिक’ या वृत्त संकेतस्थळावर अनेकदा भाजप आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली जाते. अमेरिकी कोटय़धीश नेव्हिल रॉय सिंघम यांच्याकडून ‘न्यूजक्लिक’ला निधीपुरवठा होत असतो आणि सिंघम हे चीनी सरकारबरोबर काम करतात, असा दावा ‘न्यू यॉर्क टाईम्स’मधील वृत्तामध्ये करण्यात आला आहे. याचा आधार घेऊन हा सर्व भारतविरोधी कारवायांचाच भाग आहे असा दावा ठाकूर यांनी केला.
भाजप मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकूर म्हणाले की, ‘न्यूजक्लिक हे खोटा प्रचार करणाऱ्या धोकादायक जागतिक साखळीचा भाग आहे, हे भारत आधीपासून जगाला सांगत आहे. दोन वर्षांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने न्यूजक्लिकवर छापे टाकले तेव्हा काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी सरकारच्या कृतीबद्दल प्रश्न विचारले होते. पण आता न्यू यॉर्क टाईम्सने आमचे म्हणणे खरे ठरवले आहे,’ असे ठाकूर म्हणाले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी त्यावेळी भारतविरोधी, देश तोडणाऱ्या मोहिमेला पाठिंबा दिला होता, असा आरोप त्यांनी केला.