रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांचे प्रतिपादन.
जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी १, २०२३.
“आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री श्रीम. निर्मला सितारमन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अगदी एकाच शब्दात या अर्थसंकल्पाचे वर्णन करायचे झाल्यास मी ‘सर्वस्पर्शी’ असेच म्हणेन” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दिली.
देशातील प्रत्येक घटकाचा विचार केला असल्याचे या अर्थसंकल्पाचा अभ्यास केल्यावर जाणवत आहे. शेतकरी, विश्वकर्मा, शिक्षक, व्यापारी, उद्योजक या प्रत्येकाला स्वतंत्रपणे अनेक लाभ मिळणार आहेत. अगदी रत्नागिरीबाबत बोलायचे झाल्यास मत्स्यसंपदा योजनेसाठी ६००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मस्त्य उत्पादकांनी भरभरून घ्यावे. आपला व्यवसाय वाढवावा आणि देशाच्या शाश्वत विकासात आपला सहभाग अजून ठळक करावा.
महिला वर्गासाठी जनधन आणि उज्ज्वला योजना वरदान ठरल्या. आता देशातील ८१ लाख महिला बचत गटांसाठी विशेष सहकार्य या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिले जाणार आहे. यासाठी ‘महिला सन्मान बचत योजना’ सुरु होणार आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी एक वर्षाने वाढवून सर्वसामान्य दिलासा दिला. विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात उद्योगांची व रोजगारांची निर्मिती होण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या अर्थसंकल्पातून बेरोजगारीचा प्रश्न निश्चितपणे कमी होणार आहे.
‘श्री अन्न’ योजनेच्या देश भरड धान्याचे जागतिक कोठार म्हणून उदयास येईल. २,५१६ कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात प्राथमिक सहकारी संस्था स्थापन करून साठवणुकीचे विकेंद्रीकरण करण्यात येणार आहे. शेतीसाठी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पर्यायी खतांच्या वापरासाठी ‘पंतप्रधान प्रणाम योजना’ घोषित करण्यात आली आहे. सर्व राज्यांना यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांच्या आरोग्य विषयक समस्या गंभीर आहेत. सिकलसेल ॲनेमियासारख्या दुर्धर आजाराला हद्दपार करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून त्यासाठी केंद्र सरकार आवश्यक निधी उपलब्ध करून देत आहे. याशिवाय आदिवासी विकासासाठी पुढील तीन वर्षांचा कृतीआराखडा तयार करण्यात येणार आहे.
रेल्वेसाठी तब्बल २.४ कोटी लाखांची गुंतवणूक होणार असून ही गुंतवणूक २०१३-१४ मधील तरतुदीच्या अंदाजे ९ पट मोठी आहे. यामाध्यमातून रेल्वेबाबत १०० नव्या योजना देशभर राबविण्यात येणार आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मोदी सरकार जागरूक आहे हे पुन्हा एकदा दिसून आले. गटारांच्या सफाईसाठी मानवी बळाचा वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला पंतप्रधान आवास योजनेतून घराच्या बांधकामासाठी अर्थसहाय्य पुरवले जाते. या अर्थसंकल्पात सदर योजनेसाठी असणारी तरतूद ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रुपये करण्यात आली. देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘स्वदेश दर्शन योजना’ कार्यान्वित करण्यात येत आहे. याशिवाय ७ लाखांपर्यंत कर सवलत देऊन करदात्यांना खूप मोठा दिलासा दिला आहे.
हा अर्थसंकल्प ७ स्तंभांवर आधारित असल्याचे यावेळी निर्मलाजी यांनी सांगितले. या अर्थसंकल्पातील सर्व योजनांना ‘सप्तर्षी योजना’ असे नाव दिले असून त्याचे स्पष्टीकरण विस्तृतपणे केले आहे. यामध्ये सर्वसमावेशक विकास, वंचित घटकांना प्राधान्य, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतांचा विकास, हरित विकास, युवक आणि आर्थिक क्षेत्राचा विस्तार असे ७ स्तंभ आहेत. एकंदर गतिमान आणि शाश्वत विकास साधताना देशातील कोणताहीघटक उपेषित राहू नये यासाठी मा. पंतप्रधान, मा. अर्थमंत्री व त्यांचे सहकारी तसेच मा. सहकारमंत्री यांनी एकत्रित प्रयत्न केलेले आहेत.
रत्नागिरीतील युवकांना एक नवी दिशा देणारा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाचा साकल्याने अभ्यास करावा. यातून काजू, आंबा, फणस, कोकम इत्यादी पिकांवर आधारित तसेच मत्स्य व पशुपालन व्यवसायांच्या दृष्टीने विविध उद्योगांची निर्मिती करून स्वयंपूर्ण व्हावे. देशाला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्या सर्वांचे योगदान आवश्यक आहे. अंत्योदयाच्या यात्रेत मा. मोदीजींना स्वातंत्र्याच्या अमृतकाळात सहकार्य करूया असे मी आवाहन करतो.