बंगळुरू – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांच्या विरोधात भाजपने पोलीस ठाण्यात तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
कर्नाटकातील गुलबर्गा येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना मल्लिकार्जुन खर्गेंच्या मुलाची जीभ घसरली होती. ते म्हणाले होते की, मोदींनी स्वतःला बंजारा समाजाचा मुलगा असल्याचे म्हटले होते. स्वतःला बंजारा समाजाचे सुपुत्र म्हणवून घेत त्यांनी आरक्षणाचा प्रश्न निर्माण केला. ते जर स्वतःला बंजारा समाजाचा पुत्र म्हणवून घेत असतील तर मला विचारायचे आहे की बंजारा समाजाचा मुलगा नालायक असेल तर घर कसे चालणार. प्रियांक खर्गे यांच्या याच विधानाला भाजपने आक्षेप घेतला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमुळे प्रियांकवर कारवाई होण्याची शक्यता आहे.