रत्नागिरी/ प्रतिनिधी- जयगड येथे पाच कंपन्या असून त्यांनी एकत्र येऊन मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल चालू करावे. शिवाय रत्नागिरीत अन्य कंपन्याही आहेत, त्यांनीही आपापली रुग्णालये स्थानिक रहिवाशांसाठी उभारली पाहिजेत. कारण वायूगळती झाल्यानंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणेच स्थानिक ग्रामस्थ, मुलांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन वेळा वायूगळती झाल्यानंतर त्याची दखल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घ्यायला हवी होती. खासदार नारायम राणे यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून अधिवेशन संपल्यानंतर ते रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत, असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राजेश सावंत पुढे म्हणाले,
पूर्वी कंपन्यांतील कामगारांसाठी ईएसआयसी लागू होते. त्यामुळे कामगारांना कंपनीत जीवाला धोका झाल्यास विमा उतरवला जात होता. त्याचा लाभ किती कामगारांना मिळाला आहे, याची माहिती कामगार अधिकाऱ्यांनी जनतेसाठी जाहीर करावी. शिवाय या योजनेची अमलबजावणी होत आहे की नाही, याचीही माहिती द्यावी. रत्नागिरी शहरात घरगुती गॅस व पाण्याची पाईपलाईन यांचे काम सुरू असताना आम्ही पालिकेला सांगितले की, या पाईपलाईनला धोकादायक किंवा किती फुटावर पाईपलाईन आहे, याची माहिती प्रदर्शित केली पाहिजे. जेणेकरून कोणत्याही लाईनला अडचण असल्यास सुधारणा करण्याकरिता संबंधित खात्याला माहिती कळेल, असे सावंत यांनी सांगितले.
सुरक्षाविषयक अनेक समित्या या कागदावर असतात. वायू गळतीनंतर झालेल्या बैठकीला भाजप व अन्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले नव्हते. मात्र भाजपसह सर्व पक्षीयांना जिल्हा प्रशासनाने बोलावले पाहिजे. कारण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांना फोन येत असतात. वायू गळतीच्या दिवशी सर्वपक्षीय लोक, सामाजिक संस्था माणुसकीच्या नात्याने मदत करत होते, असे राजेश सावंत यांनी सांगितले. वायू गळतीनंतर रुग्ण येऊ लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने तातडीने निर्णय घेत, केलेल्या उपचारांबद्दल कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करतो, असे त्यांनी सांगितले.