राजवाडीत अक्षय सृष्टी विज्ञान दृष्टी निवासी शिबिर उत्साहात संपन्न..

संगमेश्वर- निसर्ग, पर्यावरण आणि वैज्ञानिक विचार मुलांमध्ये शाळकरी वयापासूनच रूजवण्यासाठी ‘अक्षय सृष्टी विज्ञान दृष्टी’ हे शिबिर ५ ते ७ मे या कालावधीत संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथे उत्साहात झाले. पैसाफंड हायस्कूल, कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि राजवाडी-ब्राह्मणवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा मिळून सातवी ते नववीपर्यंतची सुमारे २५ मुलं या शिबिरात सहभागी झाली.
शिबिरात मुलींचा सहभाग लक्षणीय होता. ग्रामीण भागातील मुलांच्या पालकांवर शिबिराचा आर्थिक भार पडू नये म्हणून सर्व खर्च पुण्याचे बासुरी फाउंडेशन आणि बंगळुरूचे अरविंद कळसूर यांनी दिलेल्या देणगीतून करण्यात आला. राजवाडीच्या सरपंच सविता देवरूखकर, महिला बचतगटांच्या सदस्य सविता म्हादे आणि इतर सदस्यांनी मुलांच्या नाश्ता-भोजनाची आघाडी उत्तमप्रकारे सांभाळली तर राजवैभव राऊत, सौरभ पांचाळ, ऋषभ देवरूखकर या तरुणांनी इतर व्यवस्था आणि जबाबदारी चोखपणे पार पाडली. धामणीच्या ‘राई’ या काहीशा वेगळ्या प्रकारच्या रिसॉर्टचे प्रवर्तक अमोल लोध यांनीही या उपक्रमात मोलाचा वाटा उचलला.
आयआयटीचे माजी विद्यार्थी संजय भंडारी आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात गेली सुमारे 25 वर्ष विविध पातळ्यांवर काम करत असलेले पार्थ बापट यांनी या शिबिरात मुलांना गणिती कोडी, सौरऊर्जा, आपल्या भोवतालच्या परिसरातील निसर्गामध्ये आढळणारी जैवविविधता इत्यादींबाबत सप्रयोग आणि निसर्गफेरीद्वारे रंजक पद्धतीने माहिती दिली. पैसाफंड हायस्कूलच्या निवृत्त मुख्याध्यापिका नेहा संसारे यांनी शिबिरात पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रदीर्घ अध्यापन अनुभवाची मौलिक जोड या प्रक्रियेत दिली. हे शिबिर तीन दिवसांऐवजी किमान पाच दिवस हवे होते, या समारोपाप्रसंगी मुलांनी नोंदवलेली प्रतिक्रियाच पुरेशी बोलकी आहे. शिबिरातील अनुभवातून भविष्यात अशा प्रकारची शाळकरी मुलांसाठी शिबिरे नियमितपणे घेण्याचा मनोदय असल्याचे पेम संस्थेचे सतीश कामत यांनी सांगितले.