रत्नागिरी :- माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी )ची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च रोजी होत आहे. तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) ची परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधी होत आहे. जिल्ह्यात कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होणार नाहीत , याची कटाक्षाने दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
या परीक्षा संदर्भांत आज बैठक झाली. बैठकीस जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, योजना शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते आदी उपस्थित होते.
या परीक्षांसाठी १० वी साठी १३ परिरक्षक तर, १२ वी साठी १२ परिरक्षक कार्यालये आहेत. १० वी साठी एकूण ४२६ शाळा मुख्य परिक्षा केंद्रे ७३ आणि १८ हजार ३२३ विद्यार्थी संख्या आहे. १२ वी साठी १५४ कनिष्ठ महाविद्यालये ३८ मुख्य परीक्षा केंद्रे, १७ हजार ४८९ विद्यार्थी संख्या आहे.
जिल्ह्यात मागील ५ वर्षांमध्ये एकही संवेदनशील व उपद्रवी परीक्षा केंद्र आढळून आले नाही. एकूण सहा भरारी पथके जिल्ह्यात असणार आहेत.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जिल्ह्यात कोठेही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पोलिस विभागाने विशेष सुरक्षा विशेषत: पेपर्ससंदर्भात ठेवावी. राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी अर्धा तास आधी एस टी पोहचेल, अशी सुविधा ठेवावी. वीज वितरण कंपनीने वीज सुरळीत राहील, याची जबाबदारी पूर्ण करावी.
जाहिरात
जाहिरात