रत्नागिरी, (जिमाका) : मंदिर सफाई अभियान, शहरी तसेच ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह, महिला सशक्तीकरण उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि पीएम जनमन अभियानाबाबत जिल्हाधिकारी एम. देवेंदर. सिंह यांनी आज बैठक घेतली. मंदिर सफाई अभियान घेवून जिल्ह्यातील सर्व मंदिरांवर २१ व २२ जानेवारीला विद्युत रोषणाई करावी, अशी सूचना त्यांनी दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) शुभांगी साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर आदिंसह जिल्ह्यातील मंदिर संस्थांनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील मंदिरांमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबतची सविस्तर माहिती मंदिर संस्थांनी वेळेसह द्यावी. २२ जानेवारीच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्क्षेपण दाखविण्यासाठी भाट्ये समुद्रकिनारा, शासकीय विश्रामगृह आदिंसारख्या ठिकाणांचा विचार करावा. २२ तारखेला जिल्ह्यातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलेच आहे, त्याबरोबर २१ जानेवारीलाही संध्याकाळी ७ वा. नंतर रामकथा, गीत रामायण यासांरख्या कार्यक्रमांचेही आयोजन करावे. मुख्याधिकारी श्री. बाबर यांनी यावेळी रत्नागिरी शहरीभागातील मंदीरांमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. जयेश मंगल सभागृह येथे २२ जानेवारी रोजीच्या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासह महाप्रसादाची व्यवस्था केल्याचे ते म्हणाले.
मंदीर संस्थांतर्फे उपस्थित प्रतिनिधींनी २२ जानेवारी रोजी सकाळपासून कार्यक्रमांचे नियोजन असून, यात मंदिरांना रोषणाई, प्रसाद वाटप, दुपारचे खिचडी वाटप, थेट प्रक्षेपण, रामरक्षा कथन, ढोल ताशे वादन, फटाके वाजविणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.
मंदिर सफाई अभियान, शहरी तसेच ग्रामीण भागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह, महिला सशक्तीकरण उपक्रम, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आणि पीएम जनमन अभियानाबाबत जिल्हा, उपविभाग आणि तालुकास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करुन वेळोवेळी आढावा घेण्यबाबतही यावेळी सूचना देण्यात आली.