रत्नागिरी, दि.12 (जिमाका) : ठाणे जिल्ह्यातील हायलॅंड ढोकाळी, माजीवाडा येथे 24 व 25 फेब्रुवारी रोजी “नमो महारोजगार” मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक आस्थापना, उद्योजकांनी सहभागी व्हावे. तसेच बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज या संदर्भात बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, प्रशिक्षाणार्थी आयएएस डॉ. जस्मिन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे, एम आय डी सी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष राज आम्रे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शशिकांत कोतवडेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अमरजीत गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, कोकण विभागाचा “नमो महारोजगार” मेळावा 24 व 25 फेब्रुवारी रोजी ठाण्यात होत आहे. यामध्ये आपल्या जिल्ह्याचा या मेळाव्यात मोठा सहभाग हवा. त्या दृष्टीने सर्व उद्योजक, आस्थापना यांनी आपला सहभाग नोंदवावा, या मेळाव्याच्या अनुषंगाने बेरोजगारांना अधिकाधिक नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील, त्यादृष्टीनेही सर्वांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर या मेळाव्याची व्यापक प्रसिध्दीही करावी.