ठाणे : वारसाहक्काने नोकरीत सामावून घेण्यासाठी लाच स्विकारताना भिवंडी महापालिकेचा लिपीक बाळा जाधव (५२) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. भिवंडी महापालिकेत सापळा रचून विभागाने त्याला १५ हजार रुपयांची लाच घेताना हातोहात पकडले.
तक्रारदार यांच्या वडिलांनी भिवंडी महापालिकेत सफाई कामगार या पदावरून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. वारसाहक्काने नोकरीत सामावून घेण्यासाठी तक्रारदार यांनी ६ मार्चला महापालिकेत अर्ज केला होता.
या अर्जाच्या अनुषंगाने बुधवारी तक्रारदार हे महापालिकेचे लिपीक बाळा जाधव यांना भेटले होते. त्यावेळी नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी बाळा जाधव याने त्यांच्याकडून ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी याप्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शुक्रवारी विभागाने महापालिकेच्या कार्यालयात सापळा रचून १५ हजार रुपयांची लाच घेताना बाळा जाधव याला हातोहात पकडले. याप्रकरणी निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे