हेनरिक क्लासेन याची 63 धावांची खेळी व्यर्थ ठरली. हर्षित राणा याने केकेआरला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तसेच सूयस शर्मा याने घेतलेला कॅच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर 4 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. हैदराबादला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. मात्र हैदराबादला त्या धावा करता आल्या नाहीत. केकेआरने अशाप्रकारे 13 व्या हंगामात विजयाने सुरुवात केली. हैदराबादला विजयासाठी 209 धावांचं आव्हान मिळालं होतं. हेनरिक क्लासेन याने हैदराबादला विजयापर्यंत पोहचवलं. मात्र तो आऊट होताच सामना फिरला. हेनरिकने 63 धावा केल्या. सूयश शर्मा याने हेनरिकचा घेतलेला कॅच टर्निंग पॉइंट ठरला आणि कोलकाताने हा सामना जिंकला. कोलकाताने हैदराबादच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावला आणि त्यांना पराभवाची धुळ चारली.
हैदराबादला विजयासाठी 20 व्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. शाहबाज अहमद आणि हेनरिक क्लासेन ही सेट जोडी मैदानात होती. हर्षित राणा अखेरची ओव्हर टाकायला आला. क्लासेनने पहिल्या बॉलवर सिक्स ठोकला. दुसऱ्या बॉलवर एकेरी धाव घेत शाहबाजला स्ट्राईक दिली. शाहबाज तिसऱ्या बॉलवर आऊट झाला. चौथ्या बॉलवर मैदानात आलेल्या मार्को जान्सेन याने सिंगल काढून क्लासेन याला स्ट्राईक दिली. त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 5 धावांची गरज होती. क्लासेनने पाचव्या बॉलवर फटका मारला. मात्र सुयश शर्मा याने उलट धावत कॅच घेतली आणि इथेच सामना फिरला. क्लासेन आऊट झाल्यानंतर हैदराबादला 1 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता होती. कॅप्टन पॅट कमिन्स मैदानात आला. मात्र हर्षितने हुशारीने डॉट बॉल टाकला आणि 13 धावांचा यशस्वी बचाव केला.
सुयश शर्मा याची गेमचेंजिग कॅच
हैदराबादची बॅटिंग आणि हर्षित राणा…
हैदराबादकडून हेनरिक क्लासेन याने 29 बॉलमध्ये 8 सिक्ससह सर्वाधिक 63 धावांची खेळी केली. मात्र तो टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा या दोघांनी प्रत्येकी 32 धावा केल्या. राहुल त्रिपाठी याने 20 धावा केल्या. तर एडन मारक्रम याने 18, शाहबाज अहमद याने 16 आणि अब्दुल समद याने 15 धावांचं योगदान दिलं. तर मार्को जान्सेन 1 धावेवर नाबाद परतला. कोलकाताकडून विजयाचा शिल्पकार ठरलेल्या हर्षित राणा याने 33 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेल याने विस्फोटक खेळीनंतर दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरेन या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
केकेआरची बॅटिंग…
त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून केकेआरला बॅटिंगसाठी भाग पाडलं. केकेआरने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावा केल्या. केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक 64 धावांची नाबाद खेळी केली. तर फिलिप सॉल्ट यानेही 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. रमनदीप सिंह याने 35 आणि रिंकू सिंह याने 23 धावांचं योगदान दिलं. मिचेल स्टार्क 6 रन्सवर नॉट आऊट राहिला. वेंकटेश अय्यर 7 धावा करुन माघारी परतला. तर सुनील नरेन याने 2 रन्स केल्या. तर कॅप्टन श्रेयस अय्यर झिरोवर आऊट झाला. हैदराबादकडून टी नटराजन याने 3 विकेट्स घेतल्या. मयंक मारकंडे याने 2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन पॅट कमिन्स याच्या खात्यात 1 विकेट गेली.
▪️सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जानसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.
▪️कोलकाता नाइट रायडर्स प्लेईंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.