दिवा : दिवा पूर्व येथील मुंब्रादेवी कॉलोनी रोड, सद्गुरू नगर, आदर्श नगर, बेडेकर नगर येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत नागरिकांना उलट्या, जुलाब, दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कावीळ,पोटदुखी सारख्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. शुद्ध तसेच पुरेसा पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आशिया खंडातील दुसरा क्रमांक समजल्या जाणाऱ्या ठाणे महानगर पालिकेची ख्याती आहे. मात्र दिवा शहरात असलेल्या गावठाण आणि दिवा पूर्व वसाहतीत दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे वारंवार समाज सेवक अमोल केंद्रे पालिकेच्या निदर्शनास आणून देत आहेत. गणेश नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुषित शिवाय दुर्गंधी युक्त पाण्यामुळे सहा वर्ष्याच्या मानसी रसाळ ही चिमुकली कावीळच्या साथीमुळे दगावली असून ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही, पदिव्यात बऱ्याच ठिकाणी जलवाहिन्या या भूमिगत भागात आहेत. तसेच काही जलवाहिन्या या नाले गटारे यांच्या बाजूने गेलेल्या आहेत, तर काही जलवाहिन्या मालिनीसारण वाहिन्यांजवळून गेल्या आहेत.
या ठिकाणी काही जलवाहिन्यांना गळती असल्याने या गटारातील अस्वच्छ पाणी त्यात मिसळत आहे. त्यामुळे दिवा शहरात अस्वच्छ पाणी पुरवठा दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे येथील स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. हे दुर्गंधी युक्त दूषित पाणी पिल्याने नागरिकांना कावीळ, जुलाबाचा त्रास होत असल्याचे मत रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ठाणे महानगर पालिका पाणी पुरवठा विभागामार्फत योग्य उपाययोजना कराव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दिवा गणेश नगर येथे गेले काही दिवसांपासून दूषित तसेच दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी प्यायल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरच दूषित पाणी पुरवठा का होत आहे? याचा शोध घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा.अशी मागणी समाज सेवक अमोल केंद्रे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जाहिरात