नवी दिल्ली :- २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांना वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. भाजपविरोधात एकत्र निवडणूक रिंगणात उतरण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षही महाआघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. तर, विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपमध्येही बैठका सुरू झाल्या आहेत. १८ जुलै रोजी एनडीएची मोठी बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीत एलजेपीचे चिराग पासवान आणि दीर्घकाळापासून एनडीएपासून दूर असलेल्या अकाली दलाचे सुखबीर बादल सहभागी होणार आहेत. सुखबीर बादल आणि चिराग पासवान यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास संमती दिली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपीही या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, इतर अनेक नवे-जुने पक्षही एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहू शकतात.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या बैठकीच्या अनेक फेऱ्यांनंतर नुकतीच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री परिषदेची बैठकही झाली. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या शक्यतेबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान या बैठका होत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने चार राज्यांतील प्रदेशाध्यक्षही बदलले आहेत.
दुसरीकडे, विरोधी पक्षही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. २३ जून रोजी पाटण्यात १७ विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यादरम्यान विरोधी पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा केली होती. यानंतर आता बंगळुरुमध्ये विरोधकांची दुसरी बैठक होणार आहे.
चिराग, चंद्राबाबू, बादलांचा पक्ष NDA मध्ये सामील होणार ? भाजपची १८ ला बैठक