चिपळूण : भारत-चीन सीमेवर रस्ता बनविण्यासाठी रेकी करत असताना भुस्खलन झाल्यामुळे महाराष्ट्रातील चिपळूण येथील जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे.सुभेदार अजय ढगळे यांचा बर्फ आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला. ढगळे यांचे पार्थिव सोमवारी चिपळूण मधील मुळगावी चोरवणे आणण्यात येणार आहे. भारत-चीन सीमेवर रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे. यावेळी जागेची रेकी करण्यासाठी मोरवणे गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक मुलांचे वसतीगृह चिपळुणचे छात्र सुभेदार अजय शांताराम ढगळे हे गेले होते.
त्याचवेळी सततच्या पावसामुळे बर्फवृष्टीमुळे 24 मार्च रोजी सिक्किममध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं. त्यात सुभेदार अजय ढगळे आणि त्यांच्या बरोबर असलेले चार जवान शहीद झाले. ते मातीच्या आणि बर्फाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. याची माहिती मिळताच भारतीय सैन्य दलाने जवानांचे मृतदेह शोधण्याचे काम हाती घेतले.
मागील सहा दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. बर्फवृष्टी सुरू असताना ही शोधमोहीम सुरू होती. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांना अडथळा येत होता. पण, जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून चिखल आणि मोठाले दगड बाजूला केले.
अखेर सहाव्या दिवशी शहीद सुभेदार अजय ढगळे आणि इतर चार जवानांचे मृतदेह शोधून काढलं. शहीद अजय ढगळे हे कारगिल युद्धाच्या वेळी टायगर हिल जिंकणाऱ्या टीममध्ये होते.