
स्थानकावरील गैर सोयींकडे कोकण रेल्वे प्रशासन लक्ष कधी देणार? ग्रुपचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांचा सवाल
संगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप या रेल्वे प्रवाशी संघटनेने कोकण रेल्वे प्रशासनाला लेखी पत्र देऊन संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकातील अत्यावश्यक सुविधांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.
या पत्रात संगमेश्वर स्थानकाच्या विक्रमी वार्षिक उत्पन्नाचा आढावा देऊन रोज १८००पेक्षा अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. या स्थानकात दोन्ही फलाटांना जोडणारा पादचारी पूल हा इतके दिवस आच्छादन विरहित आहे. उन्हा- तान्हात पावसाळ्यात प्रवाशांच्या संरक्षणसाठी या पुलावर आच्छादन (पत्र्याचे छत) होणे गरजेचे आहे ही बाब ध्यानात आणून दिली आहे. याशिवाय रत्नागिरीच्या दिशेला फलाट क्रमांक एक आणि दोन यांना जोडणारा पूल होणे अत्यावश्यक आहे. फलाट क्रमांक दोन वर उतरलेल्या प्रवाशांना पायपीट करत फलाटावरील अर्धे अंतर उलट दिशेने पायपीट करावी लागते. वृध्द व्यक्ती, महिला, बालके, आजारी व्यक्ती यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. तरी या गोष्टीचे गांभीर्य ध्यानात घेऊन उपाययोजना कराव्यात असा उल्लेख या पत्रात केला आहे.
फलाट क्रमांक एक वरील काही कौलारु प्रवाशी निवारा शेड नादुरुस्त आहेत, त्या़ची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पावसाच्या दिवसात अच्छादन नसलेल्या फलाटावर सामानसुमान घेऊन ठिबकणाऱ्या प्रवाशी निवारा शेड मध्ये प्रवाशी बसलेले असतात. या दुरुस्ती कामाला वेग यावा, अशा आशयाचे विनंती पत्र दिले आहे. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व ध्यानात घेऊन पर्यटकांच्या पसंतीला संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक उतरले आहे. पण रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुविधेसाठी संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या एक्स्प्रेसना थांबा मिळावा म्हणून मागण्यांचा पाठपुरावा केला होता. इतके विक्रमी उत्पन्न या रेल्वे स्थानकातून मिळत असताना प्रवाशांच्या सुविधेकडे कोकण रेल्वे प्रशासन कानाडोळा का करते आहे? असा परखड सवाल या संघटनेचे प्रमुख पत्रकार संदेश जिमन यांनी यानिमित्ताने उपस्थित केला आहे.