तोंड दाबून, तोंडात कपड्याचा बोळा कोंबून खून केल्याची पोलीसांची माहिती
चिपळूण पोलीसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खूनाचा केला उलगडा; चिपळूण पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी…

*चिपळूण-* रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय-६५) या महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्हा हादरला होता. चिपळूण पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाची चक्रे फिरवत याप्रकरणी संशयित आरोपी जयेश भालचंद्र गोंधळेकर (वय- ४६) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जयेश याचा अन्य एक साथीदार फरार असून त्यालाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील असलेला जयेश गोंधळेकर या तरुणाने ही हत्या पैसे आणि दागिन्यांसाठीच केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. दरम्यान या गुन्ह्यात सहभागी असलेला जयेश गोंधळेकर याचा मित्र या गुन्ह्यात बरोबर होता, अशी माहिती अटक करण्यात आलेल्या जयेश याने तपासात पोलिसांना दिली आहे. त्याच्या शोधासाठी चिपळूण पोलीस ॲक्शन मोडवर आहेत. जयेश याला कॉम्प्युटरमधील चांगले ज्ञान असून यामुळेच त्याने सीसीटीव्ही फुटेज डीव्हीडीआर कॉम्प्युटरमधली हार्डडिस्क या वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर गायब केली होती. इतकच नाही तर त्यांचे दोघांचे अनेक कॉल असत याच ट्रॅव्हल्स एजंटच्या माध्यमातून जोशी यांनी अनेकदा प्रवास केला आहे. त्यामुळे जयेश याने या वृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला होता. या निवृत्त शिक्षक असलेल्या वृद्ध महिलेने ठेवलेला विश्वास आत्मघातकी ठरला. जयेश भालचंद्र गोंधळेकर हा जोशी यांच्या ओळखीचा आहे.
जयेश हा सध्या चिपळूण पाग परिसरात राहत होता. तो टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजंट होता. यातूनच तो जोशी यांच्या संपर्कात आला होता. निवृत्त शिक्षिका असलेल्या जोशी यांनी यापूर्वी आसाम, पुणे आदी ठिकाणी अनेकदा प्रवास केला होता. त्या पुन्हा एकदा हैदराबाद सहलीसाठीही जाणार होत्या. यावरूनच त्यांच्याकडे खूप पैसे व दागिने असतील या उद्देशाने जयेश गोंधळेकर याने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने हा मोठा प्लॅन करून अत्यंत निर्दयीपणे हा खून केला. तोंडात कपड्याचे गोळे घालून तोंड व मान दाबून हा खून केला. त्यांचे हातपायही यावेळी बांधण्यात आले होते. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही तो जोशी यांच्या घराच्या दिशेकडूनच येत असल्याच दिसले तसेच जोशी यांच्या घरात एक जुने प्रवास तिकीट मिळाले होते त्यावर जयेश असं नाव पोलिसांना आढळले. अन्य माहितीवरून पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं.

गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना समोर आली. ही घटना घडल्याचं कळताच तात्काळ घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे चिपळूण येथील महिला पोलीस प्रांजल जोशी आदींच्या पथकाने धाव घेऊन या प्रकरणाचा युद्ध पातळीवर तपास सुरू केला होता. यावेळी श्वान पथकाने जोशी यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या जंगलाच्या दिशेने मार्ग पोलिसांना दाखवला होता. जयेश हा खेड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती यावरून तात्काळ खेड येथून पोलीस पथकाने संशयित आरोपी जयेश गोंधळेकर याला शनिवारी ताब्यात घेतलं. या गंभीर गुन्ह्याचे प्रकरणात चिपळूण पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत दोन ते तीन दिवसात तपासाची सूत्र वेगाने फिरवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. चिपळूण पोलिसांच्या या कामगिरीचं सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र राजमाने पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे. संशयित जयेश गोंधळेकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

