
चिपळूण : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कै. राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्य मंदार पुरस्कार नुकताच चिपळूणचे ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना प्रदान करण्यात आला. रंगभूमीव्यतिरिक्त इतर क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव व विधायक कार्याची दखल घेत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या विशेष गौरवाचे औचित्य साधून नाटक कंपनी, चिपळूण यांच्यावतीने भाऊ कार्ले यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा मंगळवारी सायंकाळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत, नाटक कंपनीतर्फे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.
या वेळी नाटक कंपनीचे अध्यक्ष श्रवण चव्हाण, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, सदस्य मानस संसारे, प्रद्युम्न देवधर आदी मान्यवर उपस्थित होते.
भाऊ कार्ले यांनी चिपळूणच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीत अनेक दशके योगदान दिले असून, त्यांचे कार्य हे नव्या पिढीच्या रंगकर्मींना प्रेरणादायी ठरत आहे. नाटक कंपनी चिपळूणतर्फे त्यांचा सन्मान करून एक प्रेरणादायी कार्याचा आदर्श जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.