
मुंबई- घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर निशाणा साधला. तसंच अखेर सत्याचा विजय झाला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी, ११ मेला बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाला दिला. ‘उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, तर सरकार परत आणले असते,’ म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवलं. न्यायालयाच्या या निरीक्षणावरून आता शिंदे सरकार सत्तेत राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
‘खरं म्हणजे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. या देशात संविधान आहे, कायदा आहे, नियम आहे, असं सगळंच आहे. त्याचा बाहेर कोणालाही जाता येणार नाही. हे माझे शब्द नेहमी आपल्याला आठवत असतील. आणि आम्ही जे सरकार स्थापन केलं, ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसवून आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून सरकार स्थापन केलं. आणि बहुमताचं सरकार स्थापन झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे अनेक लोकं घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार म्हणत समाधानाने स्वतःची पाठ थोपटवून घेत होते. परंतु आज त्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. तसंच घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलं आहे,’ असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला .