
रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून पात्र एकही लाभार्थी भगिनी वंचित राहणार नाही. या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशातून उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी, औषधोपचारासाठी, स्वत:च्या खर्चासाठी मदत होणार आहे. त्यासाठी शासनाचा हातभार लागला आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे, असे उद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत काल रात्री नाचणे, आज सकाळपासून मालगुंड, गणपतीपुळे, बसणी, काळबादेवी, आडे शिरगाव, शिरगाव उद्यमनगर, मिरजोळे, मजगाव, केळ्ये , दांडेआडम आदी गावातील कुटुंबांची भेट घेतली. यानंतर झालेल्या गावभेट या मुख्य कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी राहूल पंडित, बाबू म्हाप, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, तहसिलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, या योजनेची माहिती, लाभ, तुमच्यापर्यंत पोहचविण्यात प्रामाणिक प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला आहे. या योजनेतील पैसे किती जणींना मिळाले आहे, किती जणींना मिळाले नाहीत. त्यासंदर्भात समस्या जाणून घेण्यासाठी मी कालपासून कुटुंबांना भेटी देत आहे. गावांना भेटी देत आहे आणि प्रत्यक्ष चर्चा करत आहे. या योजनेच्या लाभापासून तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी घेतली आहे. सर्व जाती धर्मासाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ तुम्हा भगिनिंना देण्यात आम्ही भाऊ यशस्वी झालो. ही योजना बंद करण्यासाठी काहीजण न्यायालयात गेले. परंतु, न्यायालयानेही या योजनेबाबत निर्वाळा दिला. भविष्यात ही योजना बंद होणार नाही. उलट या योजनेतील रकमेत वाढच होईल.

शासनाने हातभार लावलेल्या या पैशामधून महिला भगिनी स्वत:साठी खर्च करत आहेत. ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. काल नाचणे येथील एक भगिनी टेलरिंगच्या प्रशिक्षणाची शुल्क यातून भरु शकत असल्याचे आनंदाने सांगत होती. निश्चितच यातून चांगला स्वतःचा व्यवसाय उभा करता येणार आहे. योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यास शासनाचा हातभार लागत आहे, ही मोठी आनंदाची बाब असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.