मुंबई- सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं विरोधक म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.
या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, चारही बाजूने लोक येत आहे. शेवटच्या टोकापर्यंत हा महासागर पसरला आहे. भगवा उत्साह संचारला आहे. महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते हे सरकार १५ दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल, सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना एकनाथ शिंदे पुरुन उरला आणि जनतेच्या आशीर्वादाने साथीने घासून नाही घासून पुसून नाही, ठासून दोन वर्ष पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणार नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदान सोडत नाही.
हे सरकार 15 दिवस टिकणार नाही, सहा महिन्यात पडेल अशी टीका केली जायची. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे पुरून उरला. घासून पुसून नाही तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. मी बाळासाहेबांचा चेला, आनंद दिघेंचा शिष्य आहे. मी मैदानातून पळणारा नाही तर पळवणारा आहे. गेल्या दोन वर्षात, कमी काळात हे सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचे, भावांचे, शेतकऱ्यांचे लाडकं सरकार झालंय. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे गेला असता, असे शिंदे म्हणाले. माझी दाढी खुपतेय. अरे होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि विकासाची जोरात वाहू लगाली गाडी. ही दाढीची करामत आहे. म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.