मुंबई- पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी सज्ज झाल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. याच धर्तीवर २९ जूनला पंढरपूरला आषाढी वारी पार पडणार आहे. त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये, म्हणून चोख नियोजन करण्याचे आदेश गुरूवारी (१ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
पंढरपूरच्या वारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि विविध अधिकारी उपस्थित होते. यावर्षी वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विषेश नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.