कर्जत खालापूरसाठी सरकार हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही, कर्जतमध्ये ऐतिहासिक कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण…

Spread the love

कर्जत: सुमित क्षीरसागर – कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या १०० खाटांचे रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कर्जत येथील भिसेगाव भुयारी रस्ता, खोपोली येथील भुयारी गटार आदी कामे जाहीर करताना पेण अर्बन बँकेत देखील लक्ष घातले जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तर कर्जत खालापूर मतदारसंघासाठी सरकार हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी कर्जत येथील जाहीर सभेत दिली. कर्जतमध्ये ऐतिहासिक कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

कर्जतमध्ये २७० कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज रविवार दि.७ जानेवारी रोजी पार पडला. यामध्ये कर्जत शहरातील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी स्वागत कमान, उल्हासनदी किनारी प्रति पंढरपूर-आळंदी येथील ५२ फुटी विठ्ठलाची मूर्ती, छत्रपती संभाजी महाराज स्मारक, शिवसृष्टी, प्रशासकीय भवन याचे लोकार्पण सोहळा पार पडला. तर यासह माथेरान येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, खालापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, भजन सम्राट स्व. गजानन बुवा पाटील सभागृह, कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यामधील रस्त्यांचे भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी आयोजित वारकरी संप्रदायाचा दिंडी सोहळा या संपूर्ण कार्यक्रमात मुख्य आकर्षण ठरला.

यानंतर कर्जत शहरातील पोलिस ग्राउंड येथे शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, सदा सरवणकर, संपर्कप्रमुख विजय पाटील, प्रमोद घोसाळकर, विकास गोगावले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, शिवसेना शिंदे गट उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संतोष भोईर, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रास्ताविक करताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की समाज व्यसनमुक्त व्हावा ही तीर्थरूप डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे विचार आपल्यात रुजायला हवेत. आजची ही विकासकामे नसून हा विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत न्यायचं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आज वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात सामील झालेला आहे. मी गेले चार वर्षात केलेल्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री यांनी कौतुकाची थाप दिली. हेच माझ्या कर्तव्याचे फलित आहे. तर यासह पेण अर्बन बँक बुडाली त्यात कष्टकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. तेव्हा मुख्यमंत्री यांनी पेण बँकेच्या बाबत निर्णय घेऊन ठेवीदारांना दिलासा द्यावा, कर्जत शहराच्या पाणी योजनेला मंजुरी द्यावी, कर्जत भिसेगाव भुयारी मार्गासाठी निधी द्यावा , आंबेडकर भवनसाठी ५ कोटी रुपयांचा निधी द्यावा, कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी आमदार थोरवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली. तर घरात बसून कुटुंबप्रमुख होत नाही, त्यासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये फिरून त्यांचे प्रश्न जाणून घ्यावे लागतात. अशी टीका थोरवे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

तर यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की आज इथे मोठ्या प्रमाणात जमलेला जनसमुदाय पाहून या महापुरात विरोधक वाहून जातील, थोरवे यांनी कमी वेळात विकासकामांचा डोंगर उभा केला हे कौतुकास्पद आहे. आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळा आहे. अन्याय होतो तेव्हा धाडस करावं लागत, अशा वेळी बाळासाहेबांचा शिवसैनिक शांत बसत नाही. ३७० कलम, राम मंदिर हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. मोदी यांनी मंदिर केलं आणि तारीख देखील सांगितली. सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी मधून दीड वर्षात दीडशे कोटी रुपये निधी देत नागरिकांना दिलासा दिला. तर ज्योतिराव फुले योजनेत दीड लखावरून ५ लख रुपये केले. शेतकऱ्यांसाठी पीक विमा आता सरकार भरत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

तर अडीच वर्षात यांचं ट्रिपल इंजिन रडत खडत सायडिंग ला गेलं होत. मात्र आपलं डबल इंजिन सरकारने सुसाट विकास साधला. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गडण्याचे काम केले त्यांना यांनी डोक्यावर घेतलं होत. हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं कधीही चांगल. आपण स्वच्छ भारत अभियान राबवत आहोत. सिएम म्हणजे कॉमन मन. सोन्याच्या तोंडात चमचा घेऊन जन्माला आलेल्यानीच फक्त मुख्यमंत्री व्हायचं असं काही लिखित नाही. ते जेवढ्या टीका करतील त्यांना मी कामातून उत्तर देईल. शासन आपल्या दारी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. या देशातील हा पहिला उपक्रम आता अबकी बार ४५ पार अशी घोषणा देखील शिंदे यांनी दिली.

यावेळी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून ११ वारकरी संप्रदाय मंडळाला ३२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. तर कराटेपटू शीतल गायकवाड, एवरेस्टवीर संतोष दगडे, प्रतीक मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खोपोलीच्या माजी नगराध्यक्षा सुमन औसरमाल, मोहन औसरमल, राजा धुमने, मनसेचे अनिल मिंडे, प्रभाकर शेळके आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला.

मुख्यमंत्री चलबिचल, राजकीय घडामोडींना वेग ?…

कर्जत येथे सभा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दिल्लीवरून फोन आला. त्यामुळे सभेत मुख्यमंत्री यांच्यासह आयोजकांची देखील चलबिचल झाली. तर मुख्यमंत्री यांना दिल्लीवरून फोन आल्याने त्यांना तात्काळ निघायचे असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत असून ही दिल्ली वारी नक्की कशासाठी या चर्चांना उधाण आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page