सिंधुदुर्ग : राज्यात लवकरच 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे. त्याशिवाय जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
ते शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाला एकनाथ शिंदे यांनी आज उपस्थिती दर्शवली होती. यावेळी त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत शासनाने शिक्षण विभागाला दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, त्याचे आम्हाला समाधान वाटते. शिक्षकांनी शिक्षण देण्याचे उदात्त कार्य मोकळेपणाने करावे. शासन त्यांच्यावर कोणतेही बंधन टाकणार नाही. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राज्य शासनाने राज्यातील मुला-मुलींना समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. राज्यात शिक्षकांची 30 हजार पदे शासन भरत असून लवकरच पदभरती केली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनात सांगितलं.
जाहिरात :