
१५ मे/मुंबई-मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग अर्थात कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल. तसेच कोस्टल रोडच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली.
गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराजांनी त्यावर कळस चढावला. स्वराज्य रक्षण आणि विस्तार करताना संभाजी महाराजांनी अनेक पराक्रम या भूमीत केले. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे आहे. त्यांनी मुघल साम्राज्याबरोबर लढा दिला,
त्यांनी त्यांच्या कार्यकाळात १२० लढाई लढल्या; मात्र त्यांचा कधीही पराभव झाला नाही. भविष्याची आखणी करून त्यांनी जगात कुठे नसतील असे जलदुर्ग या ठिकाणी उभारले. त्यामुळे या ठिकाणी हीच प्रेरणा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या झेंड्यावर राजमुद्रेला स्थान दिलेले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.