
मुंबई :- लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार आहे. या भूकंपाचा धक्का विरोधी पक्ष सहन करू शकणार नाहीत. अहंकारी लोकांचा अहंकार संपुष्टात येणार आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. अटल सेतूच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ‘अबकी बार चारसौ पार, अबकी बार फिर मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील पुन्हा सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, देशात मोदींची गॅरंटी आहे तशी या सेतूची देखील गॅरंटी आहे. हा सेतू अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाप्रमाणेच मजबूत आहे. अत्याधुनिक यंत्रणा वापरून हा प्रकल्प आपण पूर्ण केला. हा प्रकल्प गेमचेंजर आहे. कोविड काळ होता तरी देखील अधिकारी याचे काम पूर्ण करण्यासाठी झटले. या सेतूचे भूमिपूजन मोदींनी केले होते आणि शुभारंभ देखील मोदींनी केलं आहे. आज २२ किलोमीटरचा सी ब्रीज सुरु झाला आणि त्याचा शुभारंभ मोदींनी केलाय.
मोदीजी राज्यासाठी वेळ देत असतात. मोदी यांच्या एवढं प्रेम देशात कुणालाच मिळत नसेल. विरोधकांना हे खटकत असून त्यांच्या पोटात दुखत आहे. देशात अबकी बार मोदी सरकार आणि राज्यात अबकी बार ४५ पार हा नारा मजबूत करायचा आहे. लेक लाडकी लखपती, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण या योजनांचा आपण शुभारंभ करत आहोत, असेही शिंदेंनी सांगितले.