उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण
-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

ठाणे – देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मैत्री अंतर्गत एक खिडकी योजनेतून उद्योगांना सर्व परवाने देण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


सँडोज इंडिया या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या दिघा गावातील प्रकल्पातील नव्या युनिटचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कंपनीचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर, ग्रुप प्रमुख श्री कार्लो, संशोधन विभागाच्या प्रमुख श्रीमती क्लेअर, युनिट प्रमुख सुधीर भंडारे, माजी आमदार विजय चौघुले, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


श्री. शिंदे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात देखील औषध निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. केंद्र शासन लोकांच्या आरोग्यसाठी मोठ्या प्रमाणात लक्ष देत आहे. सँडोज कंपनीने कोवीड काळात मोठे सहकार्य केले. या काळात रोगप्रतिकारक औषधांची गरज व महत्त्व कळून आले. सँडोज कंपनीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषध निर्मिती व संशोधनाकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात बल्क ड्रग पार्क उभारत आहोत. तेथे गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. सँडोज कंपनीने तेथे गुंतवणूक करून योगदान द्यावे, अशी अपेक्षा आहे.


आमचे सरकार हे लोकांचे, उद्योगांचे, विकासाचे ध्येय ठेवणारे सरकार आहे. राज्यात उद्योग वाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी. राज्य शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योगांनी येथे यावे व गुंतवणूक करावी. जनेरिक औषध निर्मितीमध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या सँडोज कंपनीनेने महाराष्ट्रातील त्यांच्या प्रकल्पात अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, यातून महाराष्ट्राची उद्योग क्षमता दिसून येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने सुमारे 1 लाख 37 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली असून ही राज्यासाठी मोठी उपलब्धी आहे. उद्योग, गुंतवणुकदारांना राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य दिले जात आहे. राज्य शासन नेहमीच औद्योगिक विकासासाठी सोबत आहे. पुढील काळातही उद्योगांना लागणारे सर्व सहकार्य राज्य शासन करेल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
संडोज इंडिया ही कंपनी औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. आज भूमिपूजन झालेल्या प्लँटसाठी कंपनीने सुमारे 250 कोटींची गुंतवणूक करणार असून येथे जेनेरिक औषध निर्मिती होणार आहे. यामध्ये सुमारे 500 ते 600 नवीन रोजगार निर्मिती होणार आहे. वर्षभरात हा प्लँट सुरू होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. युनिट प्रमुख श्री. भंडारे यांनी स्वागत केले व आभार मानले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे व श्री. मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड सुनोर यांच्यात नव्या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page