
मुंबई ,10 मे 2023-
राज्यातील शिवसेना भाजपा युती सरकारला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे, या एका वर्षात आपल्या विश्वासाचा पाया मजबूत झाला आहे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केले.
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीकरिता सोडत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. या सोडतीत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता अनामत रकमेसह प्राप्त ४८,८०५ अर्जाची संगणकीय सोडत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात आली. यावेळी शिंदे हे ऑनलाइन उपस्थित होते.
प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते आणि हे स्वप्न साकार करण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून होत आहे, म्हाडा आपली जबाबदारी यशस्वी पेलत असल्याचेही ते म्हणाले. घराबरोबर नोकरीची जबाबदारी देखील सरकारने उचलली आहे, त्यानुसार रोजगाराची १ लाख पदे भरण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे घर आणि नोकरी मिळाली तर खोळंबलेली लग्ने देखील आता होतील असेही ते म्हणाले. सोडतीत ज्यांना घरे मिळतील त्यांना त्यांच्या घरांचा ताबा लवकरात लवकर द्यावा असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले.
राज्यातील सरकारला देखील लवकरच एक वर्षे पूर्ण होणार आहे. युती सरकारने या एका वर्षात जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून आपला पाया मजबूत केला असल्याचे ते म्हणाले. राज्यात डबल इंजिनचे सरकार वेगाने काम करीत असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.