नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज गुरुवारी भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्राच्या विकासाबाबत मोदींनी फडणवीसांना कानमंत्र दिला. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र महत्वाचं राज्य असल्याचं मोदींनी फडणवीसांना सांगितले. फडणवीस २ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यावर जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५ महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घ्यायची असते. त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतली. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिर्घ वेळ भेट झाली. महाराष्ट्राबाबत काही चर्चा या भेटीत आमच्यात झाल्या. महाराष्ट्र हे अत्यंत महत्त्वाचे राज्य देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आहे. या राज्याला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी ते पूर्ण सहकार्य महाराष्ट्राला द्यायला तयार आहेत असं पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती फडणवीसांनी दिली.
त्याशिवाय मी पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह जे पक्षाचे प्रमुख लोक आहेत यांचीही सदिच्छा भेट घेतली आहे. रात्री जे.पी. नड्डा, अमित शाह आणि पक्षाचे बी.एल संतोष या नेत्यांसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. राष्ट्रपतींनी महाराष्ट्रात यावे यासाठी मी निमंत्रित केले आहे. लवकरच त्या महाराष्ट्र दौऱ्यावर येतील. मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामाने आणि मी माझ्या कामाने दिल्लीत आलोय. शिंदेचे काही काम नसल्याने ते आले नाहीत. कालपासून आजपर्यंत माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झाली. मी माझ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घ्यायला मी आलोय. त्यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील ते शिंदे आणि अजितदादा ठरवतील.
आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्याचा निर्णय भाजपा संसदीय समिती ठरवते. मंत्रिपदाचे सक्षम उमेदवार कोण असतील ते वरिष्ठ ठरवतील आणि आम्हाला सांगतील असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत. त्यासोबत पालकाच्या भूमिकेत ते असतात. काही चुकले तर रागवतात. मार्गदर्शन करतात. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात रायगडावर येऊन छत्रपती शिवरायांना नमन करून केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर ते चालण्याचा प्रयत्न करतात म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांना भेट म्हणून दिली असं फडणवीसांनी म्हटलं.