छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर बुधवारी साताऱ्यात दाखल झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघनखं ठेवण्यात आली असून संग्रहालयाच्या सभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
सातारा – छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं कडेकोट बंदोबस्तात बुधवारी दुपारी साताऱ्यात आणण्यात आली. शुक्रवारी (दि. १९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर शनिवारपासून वाघनखं शिवप्रेमींना पाहता येणार आहेत.
ऑनलाईन, ऑफलाईन तिकीटे उपलब्ध
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील प्रदर्शन शनिवारपासून (२० जुलै) नागरिकांसाठी खुले होणार आहे. पुढील ७ महिने सर्व दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत वाघनखं पाहता येणार आहेत. याची तिकिटे ऑनलाईन आणि ऑफलाईन, अशा दोन्ही पद्धतीने मिळतील. एकावेळी २०० लोकांना प्रदर्शन पाहता येईल. त्यासाठी दिवसभरात चार स्लॉट करण्यात आले आहेत. पहिला स्लॉट हा विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. दुपारी एक नंतरच्या तिन्ही स्लॉटमध्ये नागरिकांना नाममात्र शुल्कामध्ये प्रदर्शन पाहता येईल.
‘या’ संग्रहालयांमध्ये वाघनखं पाहता येणार
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरच्या सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापुरातील लक्ष्मी-विलास पॅलेसमध्ये ही वाघनखं ठेवण्यात येणार आहेत. ३ वर्षांसाठी वाघनखं लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून भारतात आणण्यात आली आहेत.
वाघनखं ही छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतीक
ऑक्टोबर, 2023 मध्ये तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे वाघनखे महाराष्ट्रात आणली गेली होती. याकरिता ते स्वत: लंडनला गेले होते. वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात 3 नोव्हेंबर, 2024 ला करार करण्यात आला होता. छत्रपती शिवरायांनी अफजल खान वधात वापरलेली वाघनखे ही महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता आहे. वाघनखे ही छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतीक आहे, असं मत सुधीर मुनगंटीवारांनी मांडलं होतं.