मिचौंग चक्रीवादळाचा तडाखा! चेन्नई विमानतळ धावपट्टीवर पाणीच पाणी

Spread the love

चेन्नई :- आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरी या समुद्र किनारी आकाशात ढग दाटून आलेत. अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस गेल्या ३-४ दिवसांपासून सुरू आहे. मिचौंग चक्रीवादळामुळे पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने अलर्ट जारी केला असून सर्वसामान्यांना सावध आणि सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. तुफान पावसानं चेन्नईच्या किनारपट्टीवरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
पावसामुळे चेन्नई एअरपोर्ट रनवेवर सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे विमान उड्डाणसेवा विस्कळीत झाली आहे. IMD नुसार, उत्तर तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये असं प्रशासनाने आवाहन केले आहे. आंध्र प्रदेश आपत्ती निवारण विभागानं मिचौंग चक्रीवादळ १३ किमी प्रतितास वेगाने बंगालच्या दक्षिण-पश्चिमतटावरून पुढे वाहत असल्याचे म्हटलं आहे.
सध्या चक्रीवादळ चेन्नईपासून जवळपास १५० किमी, नेल्लोरपासून २५० किमी, बापटहून ३६० किमी, मछलीपट्टनमहून ३८० किमी दूर आहे.मात्र समुद्र किनारी भागाला वादळाचा फटका बसत असून प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वादळामुळे रेल्वेच्या अनेक ट्रेन्स रद्द झाल्या आहेत त्यासोबतच फ्लाईटही मिळत नाही.
चक्रीवादळामुळे आज आणि उद्या अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. आंध्र आणि तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यावर त्याचा परिणाम दिसून येतोय. सखल भागात राहणाऱ्या लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले आहे. खबरदारी म्हणून बोट आणि रेस्क्यूची तयारी करून ठेवली आहे. चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपूरम, चेंगलपट्टूमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे.

या वादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम ?

या वादळामुळे विदर्भ व आग्नेय मराठवाडा वगळता राज्यात आकाश निरभ्र राहणार आहे. मराठवाड्यात पुढील ४८ तास हवामान कोरडे राहणार आहे. मराठवाड्यात ५ व ६ डिसेंबरदरम्यान आग्नेयकडील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील ४८ तास हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ४८ तास मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस होईल. तसेच सोसाट्याचे वारे वाहतील. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. ६ डिसेंबरला भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली येथे पाऊस होईल.८ तारखेनंतर राज्यात हवामान कोरडे होईल. किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page