भाजपाने देशात आघाडी घेत पहीली 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात दिग्गज उमेदवारांना संधी दिली आहे. या यादीत 53 उमेदवार असे आहेत ज्यांनी साल 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मोठ्या फरकाने विजय मिळविला होता.
भाजपाच्या पहिल्या यादीत या चार वादग्रस्त खासदारांना डच्चू, कोण ते पाहा…
मुंबई | 3 मार्च 2024 : कायम निवडणूकीच्या मूडमध्ये असलेल्या भाजपाने आघाडी घेत शनिवारी 16 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेसाठीच्या 195 उमेदवारांची पहीली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लखनऊ तर गृहमंत्री अमित शाह गांधीनगर येथून निवडणूक लढविणार आहेत. या पहिल्या यादीत 2019 मध्ये जादा फरकाने निवडणूक जिंकणाऱ्या 53 अशा उमेदवारांचा समावेश आहे, ज्यांनी अडीच लाख ते 6.89 लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकलेली आहे. या यादीत तीन मंत्र्यांसह एकूण 34 खासदारांचे तिकीट कापले आहे. तर चार वादग्रस्त खासदारांना डच्चू दिला आहे.
भाजपाने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात चार वादगस्त नेत्यांना वगळले आहे. भाजपाने 33 सिटींग एमपींना वगळले आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहीब सिंग वर्मा यांचे पूत्र परवेश वर्मा, माजी केंद्रीय मंत्री आणि हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा, भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुरी यांची नावे पहिल्या यादीतून वगळली आहेत.
दिल्लीतून पाच जागाची नावे जाहीर केली असून त्यात चार विद्यमान खासदारांना वगळून नवे चेहरे दिले आहे. चांदणी चौक मतदार संघातून दोनदा खासदार म्हणून निवडून आलेल्या आणि केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल यांना संधी दिली आहे.पश्चिम दिल्लीतून दोन टर्मचे खासदार परवेश साहीब सिंह वर्मा यांच्याजागी कमलजीत शेरावत यांना संधी दिली आहे. दक्षिण दिल्लीतून भाजपने रमेश बिधुरी यांना डावलून रामवीर सिंग बिधुरी यांना उमेदवारी दिली. नवी दिल्ली मतदार संघातून मिनाक्षी लेखी यांच्या जागी सुषमा स्वराज यांच्या कन्या बंसुरी स्वराज यांना संधी दिली आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर…
भाजापाने मध्य प्रदेशच्या भोपाळ मतदार संघातून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या ऐवजी अलोक वर्मा यांना संधी दिली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या दिग्विजय सिंह यांचा 3,64,822 मतांनी पराभव केला होता. परंतू प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी 26/11 मुंबईवरील हल्ल्यातील शहीद अशोक चक्र विजेते दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांची तुलना रावण आणि कंसा यांच्या बरोबर केल्याने त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यानंतर नथुराम गोडसे देशभक्त म्हटल्याने त्या पुन्हा वादग्रस्त ठरल्या.
रमेश बिधुरी….
रमेश बिधुरी यांनी संसदेत भाषण करताना खासदार दानिश अली यांच्या विरोधात अश्लाघ्य भाषेत टीका केल्याने ते वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बिधुरी यांना नोटीस बजावली होती. चांद्रयान मोहीमेबद्दल चर्चा सुरु असताना रमेश बिधुरी यांनी दानिश अली यांच्यावर अपमानजनक भाषा वापरीत टीका केली होती.
परवेश वर्मा…
पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांचे नाव वगळून त्यांच्या जागी यंदा कमलजीत शेरावत यांना तिकीट मिळाले आहे. परवेश वर्मा यांनी गेल्यावर्षी 9 ऑक्टोबर रोजी विराट हिंदू संमेलनात एका विशिष्ट धर्मसमुदायावर बायकॉट करा असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या जागी पहिल्या यादीत साऊथ दिल्ली म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे माजी महापौर कमलजीत शेरावत यांनी संधी देण्यात आली आहे.
जयंत सिन्हा…
हजारीबाग लोकसभा मतदार संघातून यंदा जयंत सिन्हा यांच्या जागी आमदार मनीष जयस्वाल यांना तिकीट मिळाले आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे पूत्र असलेले जयंत सिन्हा यांनी साल 2017 झारखंड येथील रामगड येथे एका मटण विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणातील आरोपींच्या वकीलांची फि जयंत सिन्हा यांनी भरली होती. या सहा आरोपींचा त्यांनी त्यांच्या हजारीबाग येथील निवासस्थानी सत्कार केल्याने ते वादात सापडले.