
श्रीहरीकोटा- इस्रोची महत्त्वाकांक्षी चांद्रयान- ३ मोहीम अंतिम टप्प्यात आली असून असून या मोहिमेकडे देशवासीयांसोबतच संपूर्ण जगाचे लक्ष लागलं आहे. या दरम्यान चांद्रयान- ३ हे चंद्राच्या अजून जवळ पोहचलं आहे. ९ ऑगस्ट रोजी चांद्रयान- ३ हे चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहचले होते. १७४ किमी x १४३७ किलोमीटर अंतराच्या लहानशा लंबवर्तुळाकार कक्षेत हे यान फिरत होते. इस्त्रोकडून चांद्रयान- ३ चंद्राच्या अजून जवळ पोहचवण्यासाठी सोमवार, १४ ऑगस्ट रोजी तिसरे रिडक्शन मन्युव्हर करण्यात आले.

इस्रोने सोमवारी तिसऱ्यांदा चांद्रयान- ३ ची कक्षा कमी केली. आता चांद्रयान १५० किमी x १७७ किमीच्या कक्षेत पोहचले आहे. म्हणजेच, चांद्रयान-३ चंद्राच्या अशा कक्षेत फिरत आहे, ज्यामध्ये त्याचे चंद्रापासून किमान अंतर १५० किमी आणि कमाल अंतर अवघे १७७ किमी आहे. इस्रोकडून पुढील पाऊल हे १६ ऑगस्ट रोजी उचलले जाणार आहे. त्यानंतर चांद्रयान-३ हे येत्या २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
इसरो ने ट्विट करून माहिती दिली…
दिलेल्या माहितीनुसार, ऑर्बिट रिडक्शन मन्युव्हर भारतीय वेळेनुसार ११.३० ते १२.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आले. चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगनंतर भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर हा विक्रम करणारा चौथा देश ठरणार आहे.

चांद्रयान- ३ पृथ्वीच्या पाच प्रदक्षिणा पूर्ण करून चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते. या दरम्यान चंद्राजवळ प्रदक्षिणा घालताना अंतराळ यानात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने चंद्राचा व्हिडिओ बनवला आणि पृथ्वीवर पाठवला. इस्रोने ट्विटरवर चंद्राची ही पहिली झलक शेअर केली होती. चांद्रयान- ३ हे यान १४ जुलै रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात आले.