संपूर्ण देशाची मान उंचावणारा आजचा दिवस ठरला आहे. चंद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग झालं आहे. या यशानंतर इस्रो अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला आणि…
मुंबई : चंद्रयान 3 चं विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे. ढोलताश्यांसह फटक्यांची आतषबाजी करत नागरिकांनी आनंद व्यक्त केला. ऊर भरून अशी ऐतिहासिक कामगिरी इस्रोने केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यान यशस्वीरित्या उतरवणारा भारत हा चौथा देश आहे. तर दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश आहे. आता दक्षिण ध्रुवावरील अनेक घडामोडींची सखोल माहिती या माध्यमातून मिळणार आहे. इस्रोच्या या यशानंतर भारताचं जगभरात कौतुक होत आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानेही या यशाबाबत अभिनंदन केलं आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्हा इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी खात्री केली आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे इस्रो अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दक्षिण आफ्रिकेत ब्रिक्स परिषदेसाठी उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमस्कार केला आणि सांगितलं की, “चंद्रावर आपण सॉफ्ट लँडिंग केलं आहे. भारत चंद्रावर पोहोचला आहे. या कामगिरीसाठी तुमचं मार्गदर्शन आणि शुभेच्छा आम्हाला द्या.” यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञ आणि देशातील तमाम जनतेचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधताना म्हणाले की, “जेव्हा आपण हा यशस्वी क्षण आपल्या डोळ्यादेखत पाहतो तेव्हा जीवन धन्य होतं. अशा ऐतिहासिक घटना जीवनातील प्रेरणा ठरतात. हा क्षण अविस्मरणीय आहे. हा क्षण विकसित भारताच्या दिशेने पाऊल आहे. हा क्षण नव्या भारताच्या जयघोषाचा आहे. ”
विक्रम लँडर आता पुढे काय करणार?
चंद्रावर दिवस आणि रात्रीचा कालावधी 14 दिवसांचा आहे. म्हणजेच 14 दिवसानंतर रात्र येते. 23 ऑगस्टला सूर्योदय होणार असल्यानेच हा दिवस निवडला गेला होता. दक्षिण ध्रुवावर आता 14 दिवस सूर्यप्रकाश असणार आहे. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत दक्षिण ध्रुवावर प्रखर ऊन असणार आहे. त्यामुळे लँडरवरील सोलार पॅनेलला मदत होणार आहे. चंद्रयान रोव्हर चार्ज होईल आणि आपलं मिशन पूर्ण करण्यास मदत होईल.