
चंद्रपूर ,30 मे 2023: चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर कालवश; वयाच्या ४७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या ४७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी, ३० मे रोजी संध्याकाळी ५ वाजता वरोरा इथे बाळू धानोरकर यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून बाळू धानोरकर यांच्यावर उपचार सुरू होते. याआधी किडनीसंबंधी आजारासाठी धानोरकरांवर नागपूर येथे उपचार सुरू होते. पण प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत हलवण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती मिळत होती. पण सोमवारी रात्री सव्वादोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. बाळू धानोरकर यांच्या पश्चात्य पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले असा परिवार आहे.
जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक हरपला
‘चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो,’ अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.