मुंबई – 18 ऑक्टोबर – लोकसभेची 2019 मध्ये 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान एकूण 7 टप्प्यांत निवडणूक झाली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजी शपथ घेतली होती. आता पुन्हा 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जानेवारी 2024 अखेर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यातील भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी हे मोठे विधान केले. ते म्हणाले की, सन 2023-24 अंतर्गत मंजूर निधीतील प्रस्तावित कामांची प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर द्या. कारण जानेवारी 2024 च्या अखेरीस लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. 2022-23 कालावधीतील निधी शिल्लक असल्यास ऑक्टोबर 2023 पर्यंत वर्क ऑर्डर देण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला बैठकीत दिले.
लोकसभेची निवडणूक 2024 मध्ये होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरु केली आहे. उमेदवारांच्या नावावर चर्चा सुरु झाली असून युती-आघाड्या निश्चित केल्या जात आहेत. राजकीय पक्षांची आपली तयारी सुरु केली आहे.
त्याचवेळी केंद्रीय निवडणूक आयोगही तयारीला लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदविणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम ठरवून दिला आहे. एकीकडे राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीस लागले असताना प्रशासनास आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी विकासकामांचा निधी खर्च करण्याचे आदेश दिले जात आहेत. कारण आचारसंहिता लागल्यानंतर विकास कामे करता येत नाही. यामुळे राजकीय पक्षांनी दोन्ही पातळ्यांवर तयारी चालवली आहे.